साईबाबांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला भाविकांची हजेरी

साई मंदिरास आकर्षक फुलांची सजावट
साईबाबांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला भाविकांची हजेरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त करोनाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच भाविकांची मांदियाळी पंढरपुरात दिसून येत असताना दुसरीकडे साईबाबांना विठ्ठल स्वरुप मानणार्‍या हजारो भाविकांनी देखील शिर्डीत हजेरी लावून साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले असून संस्थान प्रशासनाने एकादशीचे महत्त्व लक्षात घेता प्रसादरुपी साडेपाचशे किलोची शाबुदाणा खिचडी आणि झिरके तयार करण्यात आले होते.

आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखोंचा जनसागर उलटत असतो मात्र मागील दोन वर्षांपासून करोना आजाराने थैमान घातल्याने राज्यात संचारबंदी लागू आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली आहे. मंगळवार दि. 20 रोजी आषाढी एकादशीला साई समाधी मंदिराला दुबई येथील देणगीदार साईभक्त डॉ. अनिता दिनेश यांच्या देणगीतून आकर्षक फुले आणि फळांची सजावट करण्यात आली आहे.

सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत रुग्णांना, वृद्धाश्रमात, पोलीस कर्मचारी तसेच संस्थान कर्मचार्‍यांना भोजन प्रसाद मिळावा यासाठी उपवासाची 550 किलोची खिचडी आणि शेंगदाण्याचे झिरके बनविण्यात आले होते. सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस 2 हजार 500 लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला. मात्र शिर्डी माझे पंढरपूर ही आरती साईबाबा मंदिरात नित्य नियमाने म्हटली जाते.

साईबाबा हयातीत असताना साईबाबांचे परमभक्त दासगणु महाराज हे आषाढीच्या वारीला दरवर्षी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जात असत. दासगणुंची एक आषाढी वारी चुकली त्यावेळी विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या दासगणुंना साईबाबांनी विठ्ठलाच्या रुपात दर्शन दिले. तेव्हापासून दासगणु महाराजांनी शिर्डी माझे पंढरपूर अशी रचना केली. आजही साई मंदिरात बाबांच्या मंगलस्नानंतर ही आरती म्हटली जाते. आषाढी एकादशीचे महत्त्व लक्षात घेऊन विठ्ठलाची प्रतिमा समाधीवर ठेवून साईबाबांच्या मुर्तीला तुळशीची माळ अणि सुवर्ण आभुषणे चढवण्यात आली होती.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने रात्री भगवान विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा ठेवून साईंची काढण्यात येणारी रथाची मिरवणूक दोन वर्षांपासून कोविडच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com