ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक - ना. कदम

थोरात कारखान्याच्या 11111 साखर पोत्यांचे पूजन
ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक - ना. कदम

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका हे वैभव नामदार बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी व सर्वसमावेशक नेतृत्वामुळे झाले आहे. चांगले नेतृत्व असेल तर ग्रामीण विकासात किती प्रगती होऊ शकते याचे संगमनेर तालुका हा उत्तम उदाहरण असून संगमनेरचा सहकार पॅटर्न हा देशासाठी आदर्शवत ठरला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-2022 या गळीत हंगामातील पहिल्या 11111 पोत्यांचे पूजन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खा. सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींच्या उपस्थित झाले.

याप्रसंगी बोलताना ना. डॉ. कदम म्हणाले की, ग्रामीण विकासामध्ये सहकाराचा अत्यंत मोठा वाटा राहिला आहे आणि यामध्ये संगमनेर तालुका हा राज्यात अग्रगण्य आहे. सक्षम नेतृत्वामुळे सहकारातून येथे प्रगती झाली आहे. विविध सहकारी संस्था ह्या प्रत्येक कुटुंबाशी जोडल्या असून यामुळे तालुक्यात प्रगती साधता आली आहे. सहकार हा आपल्या जिवाभावाचा असल्याने तो प्रत्येकाने जपला पाहिजे. थोरात कारखान्याने नवीन 5 हजार 500 मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन साखर कारखान्याची निर्मिती व 30 मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प हा तर सर्व कारखान्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. तर दूध संघाने परराज्यात जाऊन केलेली विक्री ही महाराष्ट्राचा अभिमान वाढवणारी आहे.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, ग्रामीण भागांमध्ये खर्‍या अर्थाने सहकाराने समृद्धी निर्माण केली आहे. मागील पिढीने सहकाराचा पाया घातला. नामदार बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वाने त्यावर विकासाचा कळस चढवला आहे. सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकार आहे. तो जपला पाहिजे. ही चळवळ अधिक समृद्ध केली तर महाराष्ट्र खर्‍या अर्थाने समृद्ध होईल असा विश्वास व्यक्त करताना हा पॅटर्न सर्वत्र पोहचवण्यासाठी आपण काम करू असेही ते म्हणाले.

तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काटकसर पारदर्शकता व सभासदांचा विश्वास ही कारखान्याने त्रिसुत्री कायम जपली आहे. उच्चांकी भाव देण्याची परंपरा जपताना पुढील पन्नास वर्षाच्या दूरदृष्टीचा निर्णय घेऊन 5 हजार 500 मे.टन क्षमतेचा कारखाना निर्माण केला हा एक पथदर्शी प्रकल्प ठरला आहे.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक गणपतराव सांगळे, इंद्रजीत खेमनर, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, संपतराव गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, भास्कराव आरोटे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, मीराताई वर्पे, मंदाताई वाघ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांना भेटी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नामदार बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम यांनी अमृत उद्योग समूहातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक अमृतवाहिनी कॉलेज, सह्याद्री शिक्षण संस्था, शॅम्प्रो, डेंटल कॉलेज या सर्व सहकारी संस्थांना भेट देवून या संस्थांच्या कामकाजाची माहिती घेत सहकार मॉडेलचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com