ज्या सेवेत स्वार्थ नाही, ती सेवा भगवंताची पूजा

महंत रामगिरी महाराज || श्रीक्षेत्र कोकमठाण सप्ताहात अवतरली पंढरी!
ज्या सेवेत स्वार्थ नाही, ती सेवा भगवंताची पूजा

कोकमठाण |राहाता |तालुका प्रतिनिधी| Kokamthan| Rahata

ज्या सेवेत स्वार्थ नाही ती भगवंताची पूजा असते. या पुजेद्वारे भगवंत संतुष्ट होतात. कुणी दु:खी असेल तर त्यालाही सुख देण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

श्रीक्षेत्र कोकमठाण येथे सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहात सहाव्या दिवशी प्रवचन सेवेच्या पाचव्या वाक्पुष्पात महंत रामगिरी महाराज भाविकांच्या अथांग महासागरासमोर बोलत होते. श्रीमदभगवत गितेतील 16 व्या अध्यायातील तिसर्‍या श्लोकावर विवेचन करताना अद्रोह या गुणावर त्यांनी प्रवचन केले. काल सहाव्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी या सप्ताह सोहळ्यात पहायला मिळाली. कालच्या प्रवचनाला आ. अशुतोष काळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, रावसाहेब म्हस्के, जिल्हा बँकेचे रावसाहेब वर्पे, अस्तगावकर सराफचे अशाकराव बोर्‍हाडे, साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे, शिवाजीराव लहारे, भिमराज लहारे, राजेंद्र लहारे, बापूसाहेब लहारे, ज्ञानेश्वर ठेंग, बाळकृष्ण राशिनकर, सागर करडे, बाबासाहेब मंडलिक, शामराव शिरोळे, सर्जेराव मते, सिताराम चांडे, शिवाजी ठाकरे, गंगापूरचे संतोष जाधव, दत्तू खपके, सप्ताह समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम, कार्याध्यक्ष संभाजी रक्ताटे आदींसह भाविक लाखोंच्या संख्येने भावीक उपस्थित होते.

अद्रोह या गुणाबद्दल बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, कोणाबद्दल वाईट चिंतन करू नये. कुणाचाही द्रोह करु नये. मनात दूषित भाव आला तर अनंत जन्मापर्यंत कर्म भोगावे लागतात. महाभारतातील दृष्टांत सांगत महाराज म्हणाले, कौरव पांडवांचे युध्द 57 दिवस चालले. भिष्माचार्य अर्जुनाच्या बाणावर होते. भगवंताला ते म्हणाले, हा प्रसंग माझ्यावर कशामुळे आला. यावर भगवंताने भिष्माचार्याच्या पूर्व जन्मीचा प्रसंग सांगितला, मागील जन्मात सरड्याला काट्यात फेकले होते म्हणून या जन्मी बाणावर राहावे लागले. कर्माचे फल कुणाही चुकले नाही. कुणाचा द्वेष करू नये, एखाद्या साधुची निंदा करून देवाची पूजा करतो ते देवाला मान्य नाही. द्रौपदीचे वस्त्रहरण का झाले? यावर महाराज म्हणाले, पांडवांना खांडववन दिले होते, इंद्राला लाजवेल, इर्षा होईल असे खांडववन पांडवांनी बनवले होते. मय नावाच्या दानवाने महाल, बगीच्या बनवला होता. महालावर खुप सुंदर चित्रकारी बनविली होती. त्यावर दुर्योधन जाऊन धडकला. तेथे एक सुंदर तळे बनविले होते. त्यावर फुलांची शय्या बनविली. तेथे शय्या समजून दुर्योधन पाण्यात पडला! ते पाहून द्रौपदी हसली. अंधस्त्र पुत्र अंध: असे म्हणाली. हे कारण द्रौपदीच्या वस्त्रहरणास झाले. म्हणून द्रोह नावाचा दोष नष्ट करा, हीच भगवंताची पूजा आहे.

जशी आपली अंत:करणाची वृत्ती बनते तसे आपले मन, बुध्दी बनते. प्रत्येकाची वृत्ती दृष्टी भिन्न भिन्न असते. या वृत्तीला शुध्द करण्यासाठी चार गोष्टी सांगितल्या आहेत. आध्यात्मिक विद्या, साधू समागम, वासना परित्याग, प्राणायाम पंचकर्माद्वारे मलिनता बाहेर टाकायची, माणसाला 80 टक्के रोग शरीराच्या दुषिताकरणामुळे होतात. अंत:करणाची शुध्दी झाल्यावर सर्व गोष्टी चांगल्या दिसतात. काविळ झालेल्यांना सर्व वस्तू पिवळ्या दिसतात. जशी वृत्ती तसे जग भासते. दुर्योधनाला राज्यातील सर्वच लोक दुर्जन दिसत होते. कारण त्याची दृष्टी तशी होते. सार असाराचा भेद कळाला तरच आपण असाराचा त्याग करू शकतो. आपल्याजवळ विवेक असावा. आसक्त ज्ञान धारण करण्यासाठी वैराग्य असावे. त्यासाठी मन, इंद्रिय ताब्यात असावे. मनोनिग्रह असावा.

काही लोक सत्य बोलल्यासारखे वागतात परंतु प्रत्यक्षात तसे वागत नाही. यावर महाराजांनी एक शेतकरी व एक ग्राहक यांच्यातील दृष्टांत सांगितला. एका शेतकर्‍याने ग्राहकाला गाडीभर चारा विकला. पण तो ग्राहक बैलगाडीसह चारा विकला असे म्हणून त्याची बैलासह गाडी व चारा लुबडण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्यात वाद होऊ लागला. तेवढ्यात एक वेदांती तेथे आला. गाडीचे एक एक भाग बाजुला केले. गाडीचे काहीच उरले नाही. त्याला बैलगाडीसह चारा सिध्द करता आला नाही. फक्त चारा घेऊन तो ग्राहक गेला.

साधुसमागम यावर बोलताना महाराजांनी राजा गोपिचंद आणि त्याची आई मैनावतीचा प्रसंग सांगितला. मैनावतीने राजा गोपिचंदास आत्मकल्याणाचा मार्ग शोधण्यास सांगितले. आईचा आदेश मानून गोपिचंदाने संसाराचा, राज्याचा त्याग करून जंगलात गेला. आताचे मुले आपल्या आई-वडिलांना वृध्दाश्रमात पाठवितात. त्यांच्यावर ही वेळ का येते? वासना परित्याग यावर बोलताना महाराज म्हणाले, वासना विकारावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करा, स्वत:ला जगापेक्षा वेगळे समजणे त्याचा त्याग करा, जगात माझ्यापेक्षा कुणीतरी मोठा आहे, असे समजणे गरजेचे आहे. म्हणून अंत:करणाच्या वृत्तीतील अहंकाराचा त्याग करा. मी ज्ञानी आहे, हा अहंकारही सोडून दिला पाहिजे.

एक शेतकरी काशीस गेला. त्याने एका साधुस विचारले, पापाचा बाप कोण? तो एका विहिरीवर गेला. तेथे एक वेश्या आली. साधू चिंताग्रस्त दिसत होता. साधूने 12 वर्षे साधना करून सुध्दा त्या शेतकर्‍याच्या प्रश्नाचे उत्तर देता येईना! वेश्या साधुस म्हणाली, का चिंताग्रस्त दिसता. शेतकर्‍याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यावर वेश्या म्हणाली, चल माझ्या घरी मी तुला प्रश्नाचे उत्तर देते. वेश्या म्हणाली, बाजेवर बसा, माझ्या हातचा एक घास तुम्ही भोजन करा. साधू म्हणाला, मी स्त्रीला स्पर्श करत नाही. त्यावर वेश्या म्हणाली, एक मोहरा देते, साधू तयार झाला. तेवढ्यात वेश्येने साधुच्या मुस्कटात दिली. तर पापाचा बाप लोभ आहे. म्हणून लोभापासून दूर रहा, त्याचा त्याग करा, कोणाचेही स्वप्नातही अनिष्ट चिंतन करू नका, त्यामुळे चित्ताची शुध्दी होईल. हृदयामध्ये भगवंत प्रकट होईल.

जो साधुची टिंगल करतो, भक्ताची निंदा करतो आणि वरून भगवंताची पूजा करतो, अशी पूजा भगवंताला मान्य नाही. संत महापुरुषांंच्या वाणीमध्ये एक शक्ती असते. दुर्वाॠषींच्या शापामुळे यदु वंशाचा नाश झाला. माणसास सन्मानाची फार इच्छा असते. ती वाईट नाही, परंतु अतिमानित सन्मान नसावा.अनेक प्रकारच्या वासनेपैकी ही एक वासना आहे. तीचा त्याग करावा. अतिसन्मानाची जे इच्छा करत नाहीत तेच भगवंताला आवडतात.असेही महंत रामगिरी महाराज म्हणाले.

आज प्रवचन आणि कीर्तन !

आज सोमवारी एकादशी असल्याने दुपारी 1 नंतर महंत रामगिरी महाराज यांचे प्रवचन होणार आहे. प्रवचन संपल्यानंतर तेथेच कीर्तनही होणार आहे. प्रवचनात जंगली महाराज आश्रमातील संत मंडळींचीही प्रवचन सेवा होणार आहे. आज ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रमच्यावतीने एकादशीचे फराळ देण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com