दान केल्याने धनाची शुध्दी होते !

महंत रामगिरी महाराज || श्री श्रेत्र कोकमठाण सप्ताहात भाविकांची अलोट गर्दी
दान केल्याने धनाची शुध्दी होते !

कोकमठाण |राहाता |तालुका प्रतिनिधी| Kokamthan| Rahata

दान केल्याने धनाची शुध्दी होते, अनाथ, भुकेल्यांना अन्न द्या, गरजू पिडीत असेल त्यांना धन द्या, भगवंताने आपल्याला धन दिले असेल ते आपले नाही. कारण ते धन आपल्याला सोडून जावे लागते, असा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी केला.

श्रीश्रेत्र कोकमठाण येथे सुरु असलेल्या सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी चौथे दिवशीच्या प्रवचन पुष्पात महंत रामगिरी महाराज बोलत होते. काल राज्याचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ, ना. आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, महेंद्र गोडगे, संदीप पारख, दत्तात्रय शिणगर, मच्छिंद्र चोळके, डॉ. धनंजय धनवटे, शरद मते, पोपटराव लांडगे, अशिष धनवटे, संजय छल्लारे, आबा रोटे, सुधीर नवले, प्रकाश चित्ते, बबनराव मुठे, शरद मते, बंडू साबळे, किरण नाईक, विजय धनवटे, चंद्रकांत डोखे, साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, सचिन जगताप, डॉ. विजय कोते, अरुण येवले, किशोर थोरात, विष्णुपंत गिते, आबासाहेब वाळुंज, भाऊसाहेब महाराज, मधुसुदन महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, चंद्रकांत महाराज सावंत, गणेश महाराज शास्त्री, नवनाथ आंधळे, नवनाथ मेहेत्रे यांचेसह पाच लाख भाविकांनी एकाच दिवशी भेट दिली.

भगवद्गितेतील 16 व्या अध्यायातील 3 र्‍या श्लोकावर महाराज प्रवचन करत आहेत. त्यातील तेज, क्षमा, धैर्य यावर अगोदरच्या तीन पुष्पात विवेचन केले. महाराजांनी काल शौच म्हणजे शुध्दी यावर आपल्या सुश्राव्य वाणीतून दिड तास विविध प्रसंग, उपदेश करत भाविकांना भक्तीरसात चिंब केले. मन शुध्दी, शरीर शुध्दी, वाचा शुध्दी, अन्न शुध्दी, पारिवारिक शुध्दी, आर्थिक शुध्दी यावर भर देत त्यावर प्रवचन केले.

आर्थिक शुध्दीवर बोलतांना महाराज म्हणाले, जे धन आपण वापरतो ते शुध्द असले पाहिजे. ज्या मार्गाने आपण धन कमवत आहात, तशी आपली बुध्दी होईल. दुसर्‍याच्या हिताचा दृष्टीकोन ठेवून धन कमवाल, धनाची शुध्दी होण्याकरिता यथा योग्य दान करा, कोणी रोगी असेल, कोणी दरिद्री असेल, दु:खी असेल, अनाथ असेल, भुकेला, पिडीत असेल, गरजू असेल त्यांना धन द्या, भगवंताने आपल्याला धन दिलेले आहे ते आपले नाही. आपले जर आहे तर सोडून का जावे लागते. लंगोटी सुध्दा बरोबर नेता येत नाही. रावणाला किती संपत्ती होती. दोन्ही हात मोकळे करुन सिकंदराला जावे लागले. धनाची सुध्दा शुध्दी करावी. धन कमवितांना अनेक दोष त्या धनात आले आहेत. यावर रामदास स्वामींचा प्रसंग सांगितला.

रामदास स्वामींना शिष्यगणासह एकदा एका माणसाने भोजनाचे निमंत्रण दिले. पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता. सारासाठी चांदीच्या वाट्या होत्या. जेवण झाल्यावर एका शिष्याने वाटी टाकली झोळीत! त्या माणसाने वाट्या मोजल्या त्यात एक वाटी कमी भरली. तो म्हणाला, महाराज तुमच्या शिष्याने एक वाटी चोरली. आमचे शिष्यांवर असे संस्कार नाहीत, ते कशाला चोरतील. त्यावर तो मनुष्य म्हणाला, झोळ्या तपासायला काय अडचण आहे आणि एका शिष्याच्या झोळीत वाटी सापडली. त्यावर स्वामी म्हणाले, तू आम्हाला जे अन्न खाऊ घातले ते निश्चित चोरीचे असावे म्हणून माझ्या शिष्याची बुध्दी अशी झाली. तू अन्न कुठून घेतले. त्यावर तो म्हणाला, मी चोरीचे विकत घेतले! ज्या मार्गाने तुम्ही धन कमविले म्हणून त्या अन्नावर तसे संस्कार झाले.

नैवद्याने अन्नाची शुध्दी !

शौच म्हणजे शुध्दी! बाह्यरंगाने शरिराची शुध्दी केली जाते. नामस्मरणाने अंतरंगाची शुध्दी होते. स्नानाने शरीराची शुध्दी होते. मनाचे शुध्दीकरण केले नाही तर कलुषीतपणा येतो. शेतात गवत पेरत नाहीत ते आपोआप येते, तसे दुर्गुण आपोआप येतात. मनाचे विकार घालविण्यासाठी अंतकरणाची शुध्दी करावी लागते. अन्नाची शुध्दी असावी, अन्न तयार करण्यासाठी किती पापे आपल्याकडून होतात, त्याचा नैवद्याचा भगवंतास भोग दिल्यानंतर अन्नाची शुध्दी होती. अन्नामुळे मनाची शुध्दी होते. दूषित अन्नामुळे मनावर वाईट परिणाम होतात. यासाठी महाभारतातील दृष्टांत महाराजांनी सांगितला. द्रौपदी वस्त्रहरण होत असतांना भिष्मचार्य खाली मान घालून बसले. दुर्योधनाचे दूषित अन्न खाल्ल्याने भिष्माचार्यांवर ही वेळ आली. दूषित अन्नाचे मनावर परिणाम होतात.

वाचा शुध्दीवर बोलतांना महाराज म्हणाले, काही लोक जेथे जातील तेथे आग लावतात! पाहुणे म्हणून एखाद्याच्या घरी गेले तरी त्या घरात ते नवरा-बायकोत ताळमेळ लागू देत नाहीत. ते लोक समाजास फार घातक असतात. वाचा शुध्द हवी असेल तर कुणाचीही निंदा करु नये. देवाची केली तरी चालेल. त्यानिमित्ताने तरी देवाचे नाव तोंडात येईल. कंसाला कृष्णाची भिती म्हणून सतत नाव तोंडात येत असे. भक्ती, भगवंत चिंतन होईल त्यावेळी वाचेची शुध्दी होईल. आहार सेवन करतांना गुणवत्तेचा विचार व्हावा, स्वाद नव्हे! आळसावर बोलतांना महाराज म्हणाले, आळसी माणसे संसारही व्यवस्थित करु शकत नाही, आणि परमार्थही करु शकत नाही. माणसाने जिवनात प्रयत्नवादी असावे, आळशी नसावे.

पारिवारिक शुध्दी !

पारिवारिक शुध्दी फार महत्वाची आहे. आपल्या परिवारासाठी थोडा तरी वेळ दिला पाहिजे. केवळ मुलं जन्माला घालणे एवढेच माता पित्याचे कर्तव्य नाही. कोंबडीलाही पिले होतात. जिजाऊ मातेने शिवरायांना घडविले, प्रल्हादाला कयाधुने घडविले. सुनितीने ध्रुवास घडविले. लहान पणा पासुनच मुलांवर संस्कार करावे, 16 वर्षाचा झाल्यावर योग्य मार्गदर्शन, संस्कार गरजेचे आहे. जीवनामध्ये पारिवारीक शुध्दी फार महत्वाची आहे. परिवार शुध्द असावा. वेळेवर संस्कार महत्वाचे असतात. काही जण मुलांच्या लाथा खातात, हा पारिवारीक दोष आहे. अशुध्द परिवार दु:खाला कारण असतो. मानसिक शुध्दीवरही महाराजांनी विवेचन केले.

सप्ताहाची मागणी वाढली

पुढील 176 व्या सप्ताहाची मागणी वाढली आहे. राहाता तालुक्यातील पिंपळस पंचक्रोशीला सप्ताह द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे यांनी केली. नगराध्यक्ष साबेरभाई शेख व आ. रमेश बोरणारे यांनी मागणी केली. काल येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी येवल्यासाठी मागणी केली. वडाळा महादेव, पिंप्रीनिर्मळ, सिन्नर तालुक्यातही मागणी आली.

रहदारी होतेय जाम !

दरम्यान हा सप्ताह नगर मनमाड हायवे लागत असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने पार्क केली जातात. पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. जड वाहतूक पुणतांबा चौफुलीवरुन झगडे फाटा व सावळीविहीर अशी वळवावी, अस्तगाव माथ्यावरील महामार्ग पोलिस या यंत्रणेत दिसत नाहीत. या सप्ताहातील उर्वरित दिवसात भाविकांची संख्या वाढणार असल्याने ट्रॅफिक जाम होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com