
कोकमठाण |प्रतिनिधी| Kokamthan
उंट, घोडे.. झांज पथक, ढोलपथक...नृत्याचा धरलेला घेर, लाठ्या काठ्यांचा खेळ... लेझिम पथक...पाच हजारांहून अधिक कलशधारी महिला...पांडुरंगाचा जयघोष करत भजनी मंडळीची लयबध्द सुरावट... भगव्या पतकांची मांदियाळी...सनई चौघड्यांच्या निनादात महंत रामगिरी महाराज यांची सजविलेल्या रथातून मिरवणूक आणि तीही तब्बल तीन तास...हिरव्यागर्द परिसराने नटलेले मैदान आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत योगिराज सद्गुरू गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र कोकमठाणच्या सप्ताह मैदानात अशिया खंडातील सर्वात मोठ्या वारकर्यांच्या महाकुंभास प्रारंभ झाला.
दोन वर्षाच्या करोना महामारित सप्ताह अखंडपणे सुरू राहिला असला तरी भाविकांना त्या दोन वर्षांत सहभागी होता आले नसल्यानेच श्रीक्षेत्र कोकमठाण येथील या सप्ताहास पहिल्याच दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांच्या हजेरीने सप्ताह स्थळाला प्रतिपंढरीचे रुप आले होते. महंत रामगिरी महाराजांना सराला बेटातून मंगळवारी सकाळी 10 वाजता चार चाकी वाहनांच्या रॅलीने कोकमठाण येथे आणण्यात आले. गोदामाईच्या काठावरील या निसर्गरम्य परिसरातील गावांतील विविध दैवतांचे दर्शन घेत महाराजांना पुणतांबा येथील चौफुलीवर दुचाकीवरील रॅलीने आणण्यात आले.
तेथून ही महामिरवणूक वारकर्यांच्या, भाविकांच्या सहभागाने भव्य दिव्य काढण्यात आली. या मिरवणुकीत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे सहभागी झाले. मिरवणूक सप्ताहस्थळी आल्यानंतर तेथील होम प्रज्वलीत करण्यात आला. प्रहरा मंडपातील सराला बेटाच्या परंपरेतील सर्व संतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन प्रहरा मंडपात लाखो भाविकांच्या उपस्थितीत महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते भजनाचा विणा पूजन होऊन पंचपदी गायनाने भजनास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी भाविक भक्तांसमोर बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, करोना नंतर हा सप्ताह पहिल्यांदाच मोठ्या स्वरुपात होत असल्याने श्री क्षेत्र कोकमठाण येथील हा सप्ताह गर्दीचा उच्चांक करणार आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी ही परंपरा पावनेदोनशे वर्षांपूर्वी सुरू केली. ते सर्व भाविकांच्या सहकार्याने सुरुच राहील. अखंड हरिनाम सप्ताह हा एक तपस्या यज्ञच आहे. सद्गुरू गंगागिरी महाराज हे निष्काम संन्यासी होते. त्यांच्या परंपरेतील हे काम पुढे नेत आहोत. आहोरात्र भजन सुरू असल्याने सप्तहात पांडुरंग व प्रतिपंढरी अवतरल्याशिवाय राहणार नाही. भक्ती करताना ती नि:स्वार्थी अंत:करणाने केली पाहिजे. वारकर्याचा हा महाकुंभ आहे.
या सप्ताहाला आमदार आशुतोष काळे, संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सप्ताहाला मदत केली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी 51 लाख रुपये, महाप्रसादासाठी 175 पोती साखर आपल्या कारखान्यामार्फत देण्यात येणार आहे. विवेक कोल्हे यांनी 31 लाख रुपये व 151 पोती साखर महाप्रसादासाठी देण्यात येणार आहे. महंत रामगिरी महाराज यांनी या दोघांचे आभार मानून कोकमठाण पंचक्रोशीने मोठी मदत केल्याचे तसेच ज्यांनी ज्यांनी या सप्ताहाला मदत केली त्या सर्वांना धन्यवाद दिले.
यावेळी आमदार अशुतोष काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात अनेक वर्षांनंतर सप्ताह होत आहे. हा सप्ताह रेकॉर्ड बे्रक होणार आहे. सप्ताहाला आपण काहीही कमी पडू देणार नाही, असेही आमदार काळे म्हणाले.
संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, कोकमठाण येथे हा चौथा सप्ताह आहे. सर्व सप्ताह एकाचढ एक झाले. हा सप्ताह गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक करेल. या सप्ताहासाठी काहीही कमी पडू देणार नसल्याचे विवेक कोल्हे म्हणाले. काय ती गर्दी, काय ते भाविक, काय ती भक्ती! सगळं कसं एकदम ओके आहे. महाराज आपण ओके मध्ये हा सप्ताह पार पाडू असेही श्री. कोल्हे म्हणाले.
या सोहळ्यासाठी जंगली महाराज आश्रमाचे महंतांसह माजी मंत्री बबनराव घोलप, सुरेश थोरात, फकिरराव बोरणारे, दिलीपराव बोरणारे, विश्वासराव महाले, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, नागेबाबा मल्टिस्टेट चे कडूभाऊ काळे, सुरेशराव वाबळे, अस्तगावकर सराफ चे अशोकराव बोर्हाडे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, शामराव शिरोळे, श्रीराम ट्रॅक्टर्सचे सुरेशराव गमे, दिनकर भोरकडे, चंद्रकांत महाराज सावंत, दत्तु खपके, नवनाथ महाराज आंधळे, नवनाथ मेहेत्रे, डॉ. विजय कोते,गोविंद महाराज, भरत महाराज, मधुसूदन महाराज, शिवाजीराव ठाकरे, गोकुळ असावा, दंडवते ट्रॅक्टरचे सुरज दंडवते, शितल अॅग्रीटेकचे निपून पिपाडा यांचेसह लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकांनी पुरण पोळी, मांडे यांचा अस्वाद घेतला.
एकादशीची पंगत जंगली महाराज आश्रमाची
या सप्ताहासाठी जंगली महाराज आश्रमाचे मोठे सहकार्य लाभत आहे. ओम जंगलीदास आश्रमाने एकादशीची पंगत घेतली आहे. जनार्दन स्वामी आश्रमाने भाविकांना राहण्यासाठी मंगलकार्यालय उपलब्ध करून दिले. नामदेवराव परजणे पाटील गोदावरी दूध संघाच्यावतीने अध्यक्ष राजेश परजणे यांनी पुरणपोळी, व मांडे साठी दूध उपलब्ध करुन दिल्याबद्दल ंत्यांनाही महंत रामगिरी महाराज यांनी धन्यवाद दिले.