ज्याच्या जीवनात दु:ख नाही, त्याच्या जीवनात प्रगती नाही- रामगिरी

ज्याच्या जीवनात दु:ख नाही, त्याच्या जीवनात प्रगती नाही- रामगिरी
महंत रामगिरी महाराज

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

भगवंताचे विस्मरण ही विपत्ती आहे आणि स्मरण ही संपत्ती आहे. ज्याच्या जीवनात दु:ख नाही, त्याच्या जीवनात प्रगती नाही, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

सद्गुरू योगिराज गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहातील कालच्या 6 व्या दिवशीचे पाचवे प्रवचन पुष्प गुंफताना महंत रामगिरी महाराज यांनी त्याग, शांती, अध्यात्म, ज्ञान यावर विवेचन केले. आपल्या सुश्राव्य वाणीतून त्यांनी दीड तास प्रवचन केले. याप्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भैय्या पाटील (गंगापूर), आप्पासाहेब पाटील, भाजपाचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, मधुकर महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे, अमोल महाराज बडाख, गणेश महाराज शास्त्री, चंद्रकांत महाराज सावंत, भाऊसाहेब महाराज पठारे, महेंद्र महाराज निकम, नवनाथ महाराज आंधळे, संतोष जाधव, दत्तु खपके, बाबासाहेब चिडे यांचेसह सप्ताह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जीवनात शांती कशी निर्माण करता येईल यावर महंत रामगिरी महाराज म्हणाले, मनुष्य अशांत का असतो, सतत मनात चिंतन असते. सुखाला, दु:खाला, अधोगतीला कारण मन आहे. मन हे उन्मत्त गजेंद्राप्रमाणे धावणारे आहे. ते चंचल आहे. मनाची चंचलता नष्ट झाल्याशिवाय शांती नाही. शांती मिळविण्यासाठी मन स्थिर किंवा मनाचा विलय व्हावा. मनाच्या राजसी आणि तामसी वृत्तीचा निरोध व्हावा. यासाठी योगवशिष्ठ ग्रंथात चार उपाय सांगितले. मनोनाशाचे चार उपाय त्यात अध्यात्म विद्या, साधू समागम, वासना परित्याग, योग प्राणायाम! अध्यात्म ज्ञानाशिवाय मन स्थिर होऊ शकत नाही. अस्थिर वस्तुच्या ठिकाणी मन गेले तर ते स्थिर होऊ शकत नाही. संसार हा अस्थिर आहे.

अज्ञानामुळे चूक होत असेल तर ते क्षम्य आहे. जीवनात सतसंगती असावी. सतसंगतीत विषय वासना कमी होतात. शांती हवी असेल तर वासनेचा त्याग करावा. वासनेचे बीज जाळावे, विवेकयुक्त अंत:करणाने वासनेचा त्याग होतो. अहंकार नष्ट होतो.

सुख शांती हवी असेल तर वासनेचा त्याग करावा. काशीला एकाने अध्ययन पूर्ण केले. आचार्य पदवी मिळविली. गावाकडे निघाला. पदवीचा अहंकार होता. रस्त्यालगत एक शेतकरी शेतात पाणी भरत होता. त्यांनी पाहिले साधू चालले दर्शन घ्यावे, लांबून दर्शन घ्या. शेतकर्‍याने लांबून दर्शन घेतले. शेतकर्‍याने त्या साधूला प्रश्न विचारला पापाचा बाप कोण? हा विचार करायला लागला 12 वर्ष शिकलो पण उत्तर देता आले नाही. विचारात चालत असताना त्याला झोपही येईना. सारखे प्रश्नाचे चिंतन. एका शहरातून जात असताना तणावग्रस्त त्याचा चेहेरा एका स्त्रीने पाहिला. ती वेश्या होती. तीने तणावाचे कारण विचारले. मी काही मदत करते. त्यावर साधू म्हणाले, तू लांब रहा, मी ब्रम्हचारी आहे. त्याने कारण सांगितले. त्यावर ती म्हणाली मी उत्तर देते. त्यावर तो मनाशी म्हणाला, 12 वर्षे आपण काय केले? ती म्हणाली चला माझ्या घरी मी सांगते. तुम्ही दारापर्यंत चला मी दक्षिणा म्हणून एक मोहरा देईल.

दारापर्यंत गेला. घरात आला तर अजून एक मोहरा मिळेल. घरात गेला, आता माझ्या हातचे जेवण केल्याशिवाय उत्तर देणार नाही, असे ती म्हणाली. भोजन केले तर आणखी एक मोहर देईल. जेवण करायला बसला. तोंडात घास घालणार तर तिने एक तोंडात ठेवून दिली. म्हणाली, मी वेश्या म्हणून तुम्ही घरी यायला तयार नव्हते. या पापाला तुम्ही का प्रवृत्त झालात? तुम्हाला सोन्याच्या मोहरा दिसत होत्या. ब्रम्हचारी असतानाही पाप करण्यास प्रवृत्त झालात. याचा अर्थ पापाचा बाप आहे लोभ! लोभामुळे मनुष्य एक एक अनर्थ करायला लागतो. ज्या वेळेला मनात वासना येतात त्या वासना ज्ञानावर आवरण घालतात. यासाठी वासनेचा परित्याग करावा. मलिन वासना अतिश्य प्रबल असते. ती लवकर जात नाही. भजन साधनेने ती जात नाही. भगवंताच्या चिंतनाने तुकाराम महाराजांना समाधान मिळते. विश्वासाची दृढता जास्त असावी. परमार्थ करताना समाधान दिसत नसेल पण परमार्थाच्या जवळ गेलाय ना.

कुंतीने भगवंताकडे दु:ख मागितले होते. का मागितले? भगवंताचे विस्मरण ही विपत्ती अन स्मरण ही संपत्ती आहे. परमार्थ हे महान धन आहे. ज्या सुखात भगवंताचे विस्मरण होते ते सुख कुंतीला नको आहे. ज्या दु:खात भगवंताचे स्मरण होते ते मला दे! ज्याच्या जिवनात संघर्ष नसेल, दु:ख नसेल त्याच्या जिवनात प्रगती सुध्दा नाही. जेव्हा दु:ख निर्माण होईल तेव्हा त्या दु:खाशी सामना करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. ती निर्माण करण्याकरिता भगवान दु:ख देतात. ही भगवंताची कृपा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com