विचार शुध्द असण्यासाठी आहारही शुध्द असावा - महंत रामगिरी महाराज

महंत रामगिरी महाराज
महंत रामगिरी महाराज

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

विचार शुध्द असण्यासाठी आहारही शुध्द असावा, असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.

सदगुरु योगिराज गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताह साध्या पध्दतीने पार पडत आहे. या सप्ताहाच्या कालच्या तिसर्‍या दिवशीच्या प्रवचन मालिकेतील दुसरे पुष्प गुंफतांना महंत रामगिरी महाराजांनी भगवतगितेतील 16 व्या अध्यायातील दुसर्‍या श्लोकातील सत्य या घटकाचे विवेचन केले. कालच्या प्रवचन सोहळ्यास कोपरगावचे आ. आशुतोष काळे, सप्ताह समितीचे उपाध्यक्ष अंबादास ढोकचौळे, सदस्य तथा अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, लक्ष्मीमाता दूधचे बाबासाहेब चिडे, मुधकर महाराज, गणेंश महाराज शास्त्री, चंद्रकांत महाराज सावंत, महेंद्र महाराज निकम आदी उपस्थित होते.

द्वापारयुगात भिष्माचार्य 205 वर्ष जगले. आता भेसळयुक्त अन्न खात असल्याने आयुष्य कमी होत आहे. जास्त दिवस जगण्यासाठी आहार शुध्द असावा. यासाठी शेतात गावरान पेरा, जसा आहार आपण सेवन करतो तशी वृत्ती बनते, स्फुर्ती हा बुध्दीचा गुण आहे. विचार शुध्द हवे असतील तर आहार शुध्द करावाच लागेल. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना ते एक शब्दही बोलले नाही, इतके परिपक्व असलेले भिष्माचार्य शांत होते. दुर्योधनाला अनेकांनी समजावून सांगितले परंतु त्यांची बुध्दी कुंठीत झालेली होती. त्याने ऐकले नाही त्यामुळे सर्वनाशाला कारणीभूत ठरला. ज्या कुळामध्ये सज्जनाचा अपमान होतो, त्या कुळाचा नाश होतो. कौरवकुळामध्ये विदुरासारख्या सज्जनाचा अपमान झाला. रावणाच्या कुळामध्ये बिभिषणाचा अपमान झाला होता.

जेथे संत आहे तेथे विवेक आहे. संत आपला विवेक सोडत नाहीत. संत म्हणजे विवेक! काही जण सत्संगाला गेले तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी वेदांत शास्त्रात चार भाग केले. पामर, विषय, मुमूक्षू आणि ज्ञानी यातील जो पामर आहे तो परलोक, ईश्वर मानत नाही. सर्वच गोष्टी विज्ञानाने शक्य होत नाही. शास्त्रामध्ये श्रीमद्भागवतात अणु रेणुचा विचार तृतीय स्कंदात आलेला आहे. विज्ञानकतेचे उदाहरण देवुन आम्ही विज्ञानवादी आहोत आणि अध्यात्मावर टिका करता, अगोदर अध्यात्माचा अभ्यास करा, ग्रंथ पहा, तुम्हाला सर्व शिकायला मिळेल. विज्ञानात आधी सफलता आहे मग विश्वास आहे. अध्यात्मात आधी विश्वास मग सफलता आहे. यावर महंत रामगिरी महाराज यांनी एका राजाचा व मंत्र्यांचा प्रसंग सांगितला. ईश्वर जरी सर्वत्र असला तरी तो सामान्य रुपात आहे. ज्ञानी ज्ञान मार्गाने जाणण्याचा प्रयत्न करतो. योगी योग मार्गाने, भक्त भक्तीमार्गातुन जाणण्याचा प्रयत्न करतो, पण जाणायचे ते तत्व! यासाठी अध्यात्माची गरज आहे.

चुंबकला जसे दक्षिण धृव, उत्तर धृव असतो. तसे पृथ्वीला ही दोन धृव असतात. आपण दक्षिणेकडे पाय करुन झोपू नये, यामागे विज्ञान आहे. दोन चुंबकाचे दक्षिण धृव दक्षिण धृव एकत्र आणले तर ते एकमेकाला आकर्षित करीत नाही. पायाचा भाग जेव्हा दक्षिण बाजुला जातो, त्यावेळी पृथ्वीचा दक्षिण धृव एकाच दिशेला येतात. त्यामुळे पृथ्वीपासून या देहाला मिळणारी उर्जा हवी तशी मिळत नाही. मस्तकाच्या भागाकडे उत्तर धृव म्हणून तो उत्तरेकडे जावू नये. आपले शरीर हे पृथ्वी प्रधान शरीर आहे.

पामर ईश्वर मानत नाही, फक्त भोग, केवळ भोग मानणारे स्वत:च्या आणि दुसर्‍याच्या उपयोगी पडत नाही. मनामध्ये चांगल्या गोष्टीचा विचार येवू देत नाही. यावर महाराजांनी एक प्रसंग सांगितला. एक मनुष्य होता. त्याने जीवनभर सत्कार्य केलेच नाही. प्रत्येकाशी भाडणे, गावात एकही माणूस सोडला नाही की त्याचीशी याचे भांडण झालेले नसेल. म्हतारा झाला, एक दिवस त्याने गावाची बैठक घेतली. एरव्ही मी तुम्हाला फार त्रास दिला हो! काही तरी मला शिक्षा झाली पाहिजे. गावकरी म्हणे तुम्हाला पश्चाताप झाला ना मग जावु द्या, त्यावर तो म्हणाला काही तरी शिक्षा मला झालीच पाहिजे.

काय शिक्षण देणारा तुम्हाला, त्यावर तो म्हणाला, मी मेल्यानंतर माझ्या गळ्याला दोर बांधून स्मशनात न्यायचे! ही माझी शेवटची शिक्षा. त्याचा मृत्यु झाल्यानंतर लोक गोळा झाले, काही जण म्हणाले, याने खुप त्रास दिला ना, चलाच मग, त्याच्या गळ्याला दोर बांधला आणि चालले ओढीत. तिकडून आली पोलिस गाडी! पोलिस म्हणाले चला आता तुम्ही खुन केला. सगळं गाव पोलिस स्टेशनला, जाता जाता त्याने हे काम केले. जिवंतपणे कधी सत्कार्य केली नाही आणि जातांनाही चांगले केले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com