
वैजापूर/ राहाता |तालुका प्रतिनिधी| Vaijapur| Rahata
सप्ताह कुणा एका जातीचा नाही, कुठल्या पक्षाचा नाही, सर्वांनी सप्ताहाला यावे, अध्यात्माचा पाया सराला बेटाच्या परंपरेतील पाचही संतांनी पक्का केला, असे प्रतिपादन गोदावरी धाम (सराला बेट) चे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
सदगुरू गंगागिरी महाराज 176 वा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर शहर व तालुक्याच्या वतीने 21 ते 28 ऑगस्ट या दरम्यान होत आहे, या सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरी महाराज व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते विधिवत पूजन होऊन झाले. त्याप्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते. याप्रसंगी आमदार प्रा. रमेश बोरनारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दीपकराव पटारे, लक्ष्मी दूधचे बाबासाहेब चिडे, नागेबाबा मल्टिस्टेटचे कडूभाऊ काळे, कृष्णा डोणगावकर, सुधाकर रक्ताटे, शिवाजी ठाकरे, गिरीधर आसने, भैय्यासाहेब गोरे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्हाडे, कमलाकर कोते, भाऊसाहेब काळे, ज्ञानेश्वर सोडणार, वैजापूरचे उपनगराध्यक्ष साबरेभाई खान, पंकज ठोंबरे, बाळासाहेब संचेती, आप्पासाहेब पाटील, दिनेश परदेशी, संतोष जाधव, दत्तू खपके, विशाल संचेती, कल्याण दांगुर्डे, वाकडीचे उपसरपंच विठ्ठलराव भालेराव, मधुकर महाराज, दादासाहेब रंजाळे महाराज, चंद्रकांत महाराज सावंत, डॉ.विजय कोते, बाबासाहेब जगताप, अविनाश गलांडे, संजय बोरणारे, राधाकृष्ण बोरकर, शिल्पा परदेशी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता, बंधुता, एकात्मता, ज्ञान, विज्ञान, व्यसनमुक्ती, विकार त्याग,अन्नदान इत्यादी समाज प्रबोधन सप्तहातून होते. असे सांगून महंत रामगिरी महाराज म्हणाले, हा सप्ताह सर्वांसाठी आहे. सप्ताहाला मोठी पंरपरा आहे. सप्ताहाचे कुणालाही निमंत्रण नसते पण सर्वजण येतात. टाळकरी 4-5 पिढ्यांपासून येतात, सर्व स्वयंशिस्त पाळतात. सदगुरु गंगागिरी महाराजांनी त्या काळात सप्ताहात गरिबांना अन्न मिळावे, भजन व्हावे, ज्ञान मिळावे असे दृष्टीकोन ठेवून सप्ताह करत होते. आता या सप्ताहाला व्यापक रुप आले आहे. सप्ताहातून ज्ञान मिळते, बेटाच्या परंपरेतील पाचही संतांनी आपल्याला अध्यात्माची शिकवण दिली, त्यांनी अध्यात्माचा पाया पक्का केला.
बेटाला निधी देणार !
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, या सप्ताहाला आपल्याला बोलविले आपण धन्य झालो. महंत रामगिरी महाराज धर्मसंस्कृती पुढे नेण्याचे काम करत आहेत. बेटाला सुशोभिकरणासाठी 10 कोटींची मागणी करण्यात आली. 10 कोटी तर देवूच परंतु आपण मुख्यमंत्री यांच्याकडून यापेक्षा जास्त निधी मिळवून देऊ, मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूरला विकास आरखडा बनविला. पुढील वर्षी पंढरपूरला वारीला जा तेथे बदल झालेले दिसतील. सराला बेटाच्या सुशोभिकरणासाठी हवे ते देऊ असेही ते म्हणाले.
श्रीरामपूरला सप्ताहाची मागणी
श्रीरामपूर तालुका व शहर यांच्या वतीने सप्तहाची मागणी आपल्या भाषणात दीपक पटारे यांनी केली. सप्तहाची मागणीची कल्पना आपण ना. विखे पाटील यांना दिली आहे. नितीन दिनकर यांनीही ही मागणी केली. येवला तालुक्यातील डोंगरगावनेही सप्ताहाची मागणी केली. विठ्ठलराव लंघे, कडूभाऊ काळे यांनी नेवासा येथे पुढील सप्ताह देण्याची मागणी केली.