चांगला पाऊस पडो, शेतकरी सुखी होवो - महंत रामगिरी महाराज

पुष्प 1 ले || सद्गुरू गंगागिरी महाराज 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहास वैजापुरात प्रारंभ, पहिल्याच दिवशी गर्दीचा उच्चांक
चांगला पाऊस पडो, शेतकरी सुखी होवो - महंत रामगिरी महाराज

राहाता/वैजापूर |तालुका प्रतिनिधी| Rahata | Vaijapur

महंत रामगिरी महाराजांची रथात बसवून काढलेली भव्य मिरवणूक... भगव्या पताकांची रेलचेल...लेझीम, झांज पथक, भजनाची सुरावट...कलश मिरवणूक...लहान थोरांनी विविध वाद्यांवर धरलेला ठेका... ऐतिहासिक मिरवणूक ...प्रहरामंडपात भजनाला सुरुवात करत टाळांचा खणखणाट आणि जय हरीच्या नामघोषात वैजापूरचे सप्ताह मैदान अक्षरश: भक्तीमय झाले होते! अशा मंगलमय वातावरणात सदगुरु गंगागिरी महाराज 176 वा अखंड हरिनाम सप्ताहास काल लाखो भाविकांच्या उपस्थितीत काल प्रारंभ झाला. वैजापूर सप्ताहाने आता पर्यंतच्या सप्तहाच्या पहिल्या दिवशीच्या भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक केला! काल तीन ते साडेतीन लाख भाविकांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावत पोळी, मांडे व दुधाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

सदगुरू गंगागिरी महाराज 176 व्या अखंड हरिनाम सप्ताहास काल वैजापूरच्या दक्षिणेला मुंबई नागपूर हायवे लगत या सप्तहास काल प्रारंभ झाला. काल महंत रामगिरी महाराज यांचे गोदावरी धाम येथून वैजापूर शहरात आगमन झाले. वैजापूर शहरातील संकटमोचक हनुमान मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. महंत रामगिरी महाराज यांची सजवलेल्या रथातून मिरवूणक काढण्यात आली. या सप्तहाचे अध्यक्ष तथा आमदार प्रा. रमेश बोरनारे, मधुकर महाराज हे या रथात विराजमान होते. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भजनाची सुरवाट, डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेल्या सुवासिनी, लेझीम, झांज पथक घेऊन विद्यार्थ्यांचा लयबध्द डाव, अश्वाचे नृत्य, विविध वाद्यावर अनेकांनी धरलेला ठेका आदी विविध मिरवणुकीला साज चढविणारे वाद्य आणि नृत्याच्या प्रकाराचे प्रदर्शन करत ही मिरवणूक तब्बल तीन तास सुरू होती.

प्रहरा मंडपा जवळील ध्वजाचे पूजन आणि प्रहरामंडपातील व्यासपिठावरील बेटाच्या परंपरेतील संतांच्या प्रतिमांचे पूजन करत महंत रामगिरी महाराजांनी प्रहरा मंडपातील भजनास सुरुवात केली. पंचपदीने सप्तहास प्रारंभ झाला. आणि भजनाची सुरावटीने टाळ मृदुंगाच्या ध्वनीने सप्ताह परिसरात वारकर्‍यांमध्ये चैतन्य फुलले!

याप्रसंगी महंत रामगिरी महाराज म्हणाले, वैजापुराला पंढरी अवतरली आहे. सात दिवस याठिकाणी भजन होणार असल्याने पंढरपुरात पांडुरंगाला करमणार नाही. पांडुरंग पंढरीतून या सप्ताहात येईल. गंगागिरी महाराज यांनी 176 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या सप्तहात हरिनाम आणि अन्नदान याचा मेळ होणार आहे. पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती आहे. या सात दिवसात गंगागिरी महाराज आशिर्वादरुपाने चांगला पाऊस देतील. शेतकरी सुखी होवो, चांगला पाऊस पडो! शेतकरी अडचणीत आहे. शेतकर्‍यांना चांगला दिलासा मिळो. वैजापूरचा हा सप्ताह गर्दीच्या उच्चांकाने ऐतिहासिक ठरणार आहे. मिरवणुकीला सप्तहाच्या इतिहासात सर्वात जास्त गर्दी होती आणि सप्ताह स्थळी भाविकांची गर्दी पाहिली तर पहिल्या दिवशीची ही सर्वात जास्त गर्दी आहे. अन्न दाना बरोबरच पंगतीत वाढा! तेही पुण्य आहे.

याप्रसंगी सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार प्रा. रमेश बोरनारे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, लक्ष्मी दूधचे बाबासाहेब चिडे, नागेबाबा मल्टिस्टेटचे कडूभाऊ काळे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, वाकडीच्या संकेत नर्सरीचे संचालक विक्रांत काले, मधुकर महाराज, चंद्रकांत महाराज सावंत, गणेश महाराज शास्त्री, बाळासाहेब महाराज रंजाळे, विठ्ठलदास असावा, नवनाथ महाराज आंधळे, संदीप महाराज जाधव, मधुसूदन महाराज, सुनील महाराज कोळपकर, आनंद आहेर, ममदापूरचे रमेश जवरे, नवनाथ मेहेत्रे, सप्ताह समितीचे उपाध्यक्ष बाबासाहेब जगताप, वैजापूरच्या नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरभाई खान, बाळासाहेब संचेती, दिनेश परदेशी, पंकज ठोंबरे, भगवान तांबे, सचिन वाणी, कल्याण जगताप, माजी आमदार सुभाष झांबड, बाळासाहेब पवार, खंडेराव सदाफळ, भाऊसाहेब काळे, बबनराव मुठे, गोटू रजपूत, संजय महाराज जगताप, अ‍ॅड. प्रमोद जगताप, दत्तात्रय गुंजाळ, बी. डी. गमे, पी. डी. गमे, नारायण गारकर, कुंडलिकराव वाघे, आर. एस. जाधव, डॉ. विजय कोते, सुभाष कोते, सोन्याबापू आहेर, सचिन शेवाळे, भारत डोखे, सोपान एलम, रामभाऊ लहारे, दादा आहेर, मधुकर मोमले आदींसह भाविक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताह मैदान फुलले !

या सप्तहात पहिल्याच दिवशी उच्चांकी गर्दी पाहावयास मिळाली. वैजापूर, गंगापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर, नाशिक भागातील भाविकांनीही हजेरी लावली. मांडे आणि पुरणपोळीचा प्रसाद भाविकांनी घेतला. गर्दी पाहता प्रसादासाठीचे दूध पुन्हा मागवावे लागले. गर्दी असूनही शिस्तीचे प्रदर्शन पाहावयास मिळाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com