काँग्रेसचे शहराध्यक्ष चौगुले व जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

कोविड निषिद्ध क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केल्यामुळे
काँग्रेसचे शहराध्यक्ष चौगुले व जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये कोविड निषिद्ध क्षेत्रात विनापरवानगी तसेच पीपीई कीट परिधान न करता व दक्षता न घेता रुग्णालयात प्रवेश करून कोविड उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले व साईबाबा वेलफेअर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी दिली.

श्री साईबाबा संस्थानचे सीसीटीव्ही कंट्रोल रूममधील कर्मचारी किशोर साहेबराव गवळी (वय 44) यांनी याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 9 व 10 मे दरम्यान सचिन चौगुले व अरुण जाधव दोघेही रा. शिर्डी यांनी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल येथील कोविड 19 च्या रूग्णांचे आयसीसीयु व जीआयसीयू मध्ये कोविडचे निषिद्ध क्षेत्र म्हणून जाण्याची परवानगी नसतांना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, पीपीई कीट परिधान न करता व दक्षता न घेता तेथे प्रवेश करून उपचार घेत असलेल्या रुग्णांना भेटून जिल्हाधिकार्‍यांनी करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या डी सी कार्या 9 ब 1/105/2021 या आदेशाचे उल्लंघन केले आहे.

या फिर्यादीवरून काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले व संस्थानच्या विद्युत विभागाचे कर्मचारी अरुण जाधव यांचे विरोधात भादंवि कलम 188, 269, 271 साथरोग अधिनियम 1897 चे कलम 2 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रूपवते करीत आहेत.

श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा फोन मला माझ्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे तातडीने आहे तसाच हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथली अवस्था आणि व्यवस्था अंगाला घाम फोडणारी होती. याकडे संस्थानच्या अधिकार्‍यांचे लक्ष वेधत सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणलेला गलथान कारभार यामुळे विचलित होऊन व राग मनात धरून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. कोविड काळात इतर विविध पक्षांचे स्थानिक नेतेमंडळी यांनी देखील रुग्णालयात भेटी दिलेल्या आहेत. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्यावर आणि सर्वच रुग्णांचे नातेवाईक पीपीई किट शिवाय तेथे राहतात, त्यांच्यावर संस्थान प्रशासन गुन्हे दाखल करणार का?

- सचिन चौगुले, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी शिर्डी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com