महाराष्ट्राला लस न देण्याची सीरमला केंद्राकडून तंबी - ना. मुश्रीफ

लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण राबविण्याची मागणी
महाराष्ट्राला लस न देण्याची सीरमला केंद्राकडून तंबी - ना. मुश्रीफ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना प्रतिबंधक लस उत्पादित करणार्‍या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने जून महिन्यांत दहा कोटी डोस उपलब्ध करून देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला लस उपलब्ध न करण्याची तंबी दिली. एकीकडे राज्य सरकारने 18 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण करावे, असे सांगायचे आणि दुसरीकडे कंपन्यांना धमकावून राज्य सरकारला लस मिळणार नाही अशी व्यवस्था करायची असा प्रकार सुरू असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यामुळे केंद्र सरकारने लसीकरणाचे राष्ट्रीय धोरण निश्चित करून सर्व लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्य सरकारच्या शिवस्वराज्य उपक्रमाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते नगर जिल्हा परिषदेत झाला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या लसीकरणाच्या गोंधळाबद्दल ते म्हणाले, लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारने आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारने लस द्यायची, हे धोरण योग्य नाही.

तिकडे पश्चिम बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात येत आहे. 18 ते 44 वयोगटातील नागिरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो तर त्यापुढील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो, देशात असा गोंधळ सुरू आहे. असे असेल तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर लावू. लसीकरणावरून देशात हा जो गोंधळ सुरू आहे, तो योग्य नाही. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

अमेरिकेने आपल्याला लसींचे 25 हजार कोटींचे डोस दिले. असे सांगुन मुश्रीफ यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे आभार व्यक्त केले. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षांचे मन किती मोठे आहे, हे यावरून लक्षात आले, असेही मुश्रीफ म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com