file photo
file photo
सार्वमत

ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ

नेटवर्क नाही, महागडे मोबाईल घेण्याची ऐपत नाही, विद्यार्थ्यांचे नुकसान

Arvind Arkhade

देवळाली प्रवरा|वार्ताहर|Devlali Pravara

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याने शासनाने इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत. काहींकडे तेही नाहीत. ज्यांच्याकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत नसल्याने परिसरात ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.

करोना विषाणूपासून मुलांना संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू केली आहे. परंतु याचा फक्त शहरी भागातीलच विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित राहिल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सध्या परिसरातून शाळेत जाणारे विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत.

अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. ही मुलं वाड्यावस्त्यावर रहात असल्याने अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून आयडिया व वोडाफोन यांचे टॉवरच बंद आहेत. एअरटेलचे टॉवर सुरू आहे परंतु नेटवर्क मिळत नाही. मिळाले तरी ते खूप धिम्यागतीने चालते.काही ठिकाणी तर तेही चालत नाही.

त्यामुळे अनेकांनी जिओचे कार्ड घेतले. परंतु जिओला देखील सर्वच ठिकाणी नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे याचा फायदा फक्त शहरातील व शहरा जवळ असणार्‍या विद्यार्थ्यांना मिळत आहे. वाड्यावस्त्या वरील विद्यार्थी यापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी कुटुंब असल्याने अनेकांना संकेतस्थळ डाऊनलोड करता येत नाही. काहींना त्याची माहिती नाही. मुलांना माहिती आहे तर नेटवर्क मिळत नाही.

शेतीची कामे व जनावरं-ढोरांची निगा राखण्यात शेतकर्‍यांचा वेळ जात असल्याने त्यांनी मुलांना अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल घेऊन दिले खरे! परंतु मुले ऑनलाईन अभ्यास करण्याऐवजी त्यावर गेमच जास्त वेळ खेळत बसतात. जे गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या कुटुंबाची असा महागडा मोबाईल घ्यायची ऐपत नाही. ते तर या शिक्षण पध्दतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा ग्रामीण भागात बट्ट्याबोळ झाला असून आजही अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू झाल्यापासून इयत्ता 1ली ते 10 वीचे शिक्षक व संबंधित संस्था त्या संस्थेच्या संकेतस्थळावर किंवा शासनाच्या संकेतस्थळावर मुलांसाठी अभ्यासक्रम टाकतात. हा अभ्यास शहरातील ठरविक मुलेच करतात व केलेला अभ्यास व्हॉट्सअ‍ॅपवर टाकतात. हे बघून संबंधित शिक्षक त्यांनी पाठविलेला अभ्यास सर्व ग्रुपवर टाकून आपण किती कर्तव्यदक्ष आहोत? हे दाखवून आपणच आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहेत.

वास्तविक पाहता प्रवेश घेतलेल्या मुलांच्या संख्येपैकी साधारणपणे 50 ते 60 टक्के मुलांना तरी याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु मात्र, सध्या तरी असे होताना दिसत नाही. यामध्ये इंग्लीश मेडीयम शाळेचा वेगळा, जिल्हा परिषद शाळेचा वेगळा व इतर संस्थांचा वेगवेगळ्या पध्दतीने अभ्यासक्रम संकेतस्थळावर येत असल्याने मुलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा गोंधळ थांबविण्यासाठी मुलांना पुस्तके वाटून घरी अभ्यास करण्यास सांगावे व संबंधित शिक्षकांनी आठवड्यातून दोनदा करोनाचे नियम पाळत तोंडाला कापडी पट्टी बांधून वाड्यावस्त्यावर व ग्रामीण भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी समजून त्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com