सार्वमत

पसार आरोपीचा तिसर्‍या दिवशीही सुगावा नाही

Arvind Arkhade

माळवाडगाव|वार्ताहर|Malvadgav

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला मुठेवाडगाव खून प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला अन् रूग्णालयात उपचार घेऊन येताना पोलीस व्हॅनमधून बेड्यासह पसार झालेला सराईत गुन्हेगार सचिन काळे यांचा तिसर्‍या दिवशीही सुगावा लागला नाही. त्यास शोधण्यासाठी पोलीस पथके गंगापूर, पैठण,औरंगाबाद परिसरात कसून तपास करीत त्याला पकडण्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पसार आरोपी संदर्भात पो. हे. कॉ. शिवाजी दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली असून ग्रामीण रूग्णालयातून येताना हरेगाव रस्त्यावर पोलीस व्हॅनमधून मुठेवाडगांव खून प्रकरणातील आरोपी सचिन नेमाजी काळे, रा. मुठेवाडगाव, भोंदू उर्फ रूपचंद नैराज भोसले आष्टी, निघुडी, जि. बीड यांच्याविरुद्ध गु.र.नं. 1184/2020 भादंवि कलम 224, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनेच्या दिवशी घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उप अधीक्षक राहूल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी भेट दिल्यानंतर तपासाची चक्रे गतीने फिरताच एका आरोपीस जवळच शिरसगाव हद्दीत उसात जेरबंद करण्यात यश आले.

मात्र खून प्रकरणातील मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार सचिन काळे याचा तिसर्‍या दिवशीही सुगावा लागला नाही. या तपासासंदर्भात पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही त्यास पकडण्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

बेड्यासह फरार झालेल्या सचिन काळे याने कमालपूरकडे जाताना रस्त्याचे कडेला समाधान मुठे यांची वस्तीवरून चोरून नेलेली मोटारसायकल क्र. एमएच- 17 सीए-0482 बिडकीन पासून खाली एका खेड्यात बेवारस सापडली. यामुळे पोलिसापुढे आरोपीस शोधण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सचिन काळे परराज्यातही गुन्हे करण्यास सराईत आहे. मोटारसायकल गंगापुरहून पुढे बिडकीनकडे त्यानेच नेली की पोलिसांना तपासात चकवा देण्यासाठी आपल्या हस्तकाकरवी नेऊन सोडली? एक ना अनेक दिशेने पोलीस यंत्रणा कसून तपास करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com