रुईत गटारीचे पाणी घरात

ग्रामस्थांनी थाटला रस्त्यावर संसार
रुईत गटारीचे पाणी घरात

सावळीविहीर |वार्ताहर| Savali Vihir

राहाता तालुक्यातील रूई ग्रामपंचायत हद्दीत मागासवर्गीय वस्तीमधे ड्रनेजचे पाईप फुटून दुर्गंधी युक्त पाणी घरात शिरल्याने रुई ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांना वेळोवेळी सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने येधील रहिवाशांनी जनावरांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या मांडत संसार थाटल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

संतोष खरात हे गावचे पुर्वेला पिंपळवाडी शिर्डी रस्त्याच्या कडेला राहतात. त्याच्या घरामध्ये गटारीचे पाणी शिरत असल्याचे सरपंच संदीप वाबळे व ग्रामसेवकांकडे तक्रार करत ते पाणी त्वरित बंद करावे. दूषित पाण्यामुळे गायी आजारी पडल्या असून घरातील माणसे आजारी असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची आठ दिवस वाट पाहूनही कुणी फिरकले नाही. सहनशीलतेचा अंत झाल्याने खरात कुटुंबियांनी जनावरांसह आंबेडकर चौकातील रस्त्यावर ठिय्या मांडला सदर रस्त्यावरून शिंगवे, सावळीविहीर, पिंपळवाडी, शिर्डीकडे वाहतूक होत असल्याने काही वेळातच वाहनांची मोठी गर्दी निर्माण झाली.

सदरची घटना ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना समजल्याने त्यांची पळतीभुई थोडी झाली. प्रसंगावधान राखत शिर्डी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी खरात कुटुंबियांनी ग्रामपंचायतीचा निषेध करत येथील गटाराचे पाईप त्वरित बंद करावेत, असा पवित्रा घेतला. सरपंच संदीप वाबळे यांनी घटनास्थळी येऊन आम्ही काम करणार होतो परंतु या टोकाला जायची गरज नव्हती असे म्हणाल्याने जमाव आणखीच तिव्र झाला. शेवटी शिर्डी पोलिसांच्या मध्यस्थीने वादावर पडदा पडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com