अहमदनगर l Ahmednagar

सध्या इंग्लंडमधील काही भागात करोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला असून या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्राप्त सूचनानुसार राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करणेत येत आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दि. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून परतलेल्या व अहमदनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 25 व्यक्तींची यादी जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली आहे. या यादी नुसार जिल्ह्यात विशेष सर्वेक्षणाअंती 19 व्यक्ती हया अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तर 6 व्यक्ती या ग्रामीण आढळून आलेल्या आहेत. या 25 व्यक्तीपैकी 20 व्यक्तीची आर.टी.पी.सीआर तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आलेले आहेत. उर्वरीत 5 व्यक्तींचे आर.टी.पी.सी.आर. तपासणीसाठी नमुने घेण्यात आले असून तपासणी अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज दिली.

यासंदर्भात, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा प्रशासनातर्फे अहमदनगर जिल्हावासियाना आवाहन केले आहे. जिल्हयामध्ये जे कोणी 25 नोव्हेंबर 2020 नंतर इंग्लंडहून परतलेले आहेत त्यांनी स्वतःहून अहमदनगर महानगरपालिका, जिल्हयाच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करावे, असे या आवाहनात म्हटले आहे. निवासी उपजिन्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.