रस्त्याने फिरणार्‍यांची रॅपीड ऐवजी आरटीपीसीआर चाचणी करा

बहुजन वंचित आघाडीची मागणी
संग्रहित
संग्रहित

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - रस्त्यावर फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी करण्याचा आदेश तात्काळ रद्द करून त्याऐवजी अशांची मोफत आरटीपीसीआर चाचणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विनाकरण फिरणार्‍यांची होणार अँटीजेन चाचणी या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले असून या वृत्तात ग्रामीण भागात गर्दीच्या ठिकाणी चेक पोस्ट लावुन त्या ठिकाणी विनाकारण फिरणार्‍यांना पकडुन त्यांची अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले असल्याचे नमुद आहे.

अँटीजेन चाचणी ही भरोशास पात्र चाचणी नसून या चाचणीद्वारे असंख्य खोटे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. जे लोक पॉझिटीव्ह आहेत त्यांची कधी कधी अँटीजेन चाचणी निगेटिव्ह येते व लोक निगेटिव्ह आहेत त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह येते. यामुळे समाजाची मोठया प्रमाणात हाणी होत आहे. या निर्णयामुळे करोना बाधितांमध्ये अजून भर पडणार आहे. या आदेशामुळे अँटीजेन चाचण्या केल्या जाऊन निगेटिव्ह असलेल्या लोकांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. आणि त्यांना करोना केअर सेंटरमध्ये किंवा ग्रामीण रुग्णालयात पाठविले तर ते लोक तिथे जाऊन खरोखर कोविड पॉझिटिव्ह होतील व त्यांचे संसार उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.

ज्यांच्या घरी काही समस्या असेल, घरात कर्ता पुरुष नसेल आणि त्याची आपल्या आदेशान्वये अँटीजेन चाचणी केली गेली तर तो पॉझिटीव्ह नसताना अँटीजेन चाचणीमध्ये पॉझीटीव्ह आला तर त्यांचे संपुर्ण कुटुंब उध्वस्त होईल, त्यामुळे याची शहानिशा करूनच निर्णय घ्यावा, असे वंचित बहुजन आघाडीचे चरण दादा त्रिभुवन, संदिप पवार, अभिषेक सोनवणे, एफ. एम. शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com