आरपीआयच्यावतीने श्रीरामपुरात मोर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा लवकर बसवा
आरपीआयच्यावतीने श्रीरामपुरात मोर्चा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोरील नियोजीत जागेत बसविण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, श्रीरामपूर व समस्त आंबेडकरी जनतेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आरपीआयचे झेंडे हातात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराच्या घोषणेने शहर दुमदुमून टाकले होते. यावेळी मुख्याधिकार्‍यांच्यावतीने उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व जिल्हा कार्याध्यक्ष भिमा बागुल यांच्या नेतृत्वाखाली काल या मोर्चासाठी श्रीरामपूरच नव्हे तर अन्य तालुक्यांतील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सदरचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मेनरोड, शिवाजीरोड मार्गे पालिकेवर नेण्यात आला. पालिकेसमोर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा श्रीरामपूर शहरात पुर्णाकृती पुतळा रेल्वे स्टेशन येथील नियोजीत जागेत बसविण्यात यावा. श्रीरामपूर नगरपरिषदेने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर या पुर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू करावे, अशी आंबेडकरी समाजाची गेल्या अनेक दिवसांची मागणी पूर्ण करावी. याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका अवती भवती कोणत्याही राजकिय पक्षाचे व वाढदिवसाचे बॅनर लावण्यास बंदी घालून परवानगी देऊ नये. लवकरच श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचेही स्मारक उभारावे. राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक श्रीरामपूर शहरात उभारावे, अशा अन्य मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या.

आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण झाली नाही तर आम्ही 15 दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भिमा बागुल, बाळासाहेब गायकवाड, भाजपाचे प्रकाश चित्ते, विजय शेलार, रमाताई धिवर, मोहन आव्हाड, कुमार भिंगारे, जयश्री शेळके, मुख्तार शेख यांची भाषणे झाली.

सदरचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पप्पू बनसोडे, सुनील शिरसाठ, विजय पवार, राजू मगर, राजू गायकवाड, संजय बोरगे, मनोज काळे, आबा रणनवरे, रमेश अमोलिक, सरपंच महेंद्र साळवी, मोहन आव्हाड, अँथोनी शेळके, सागर भोसले, प्रदीप गायकवाड, सिध्दार्थ बागुल, दीपक गायकवाड, अशिष शेळके, विलास साळवे, सुशिल धाइजे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com