साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत रोटेशन बंद करण्यात येऊ नये

साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत रोटेशन बंद करण्यात येऊ नये

बेलापूर |वार्ताहर| Belapur

प्रवरा डावा कालव्यातून ओझर बंधार्‍यात अनेक दिवसापासून साचलेले पाणी सोडण्यात आले आहे. सदरचे पाणी दूषित व खराब असून पिण्यास योग्य नसल्यामुळे पिण्यासाठी निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी सोडावे तसेच पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत रोटेशन बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे तसेच श्रीरामपूर नगरपरिषदेचे पाणी पुरवठा अभियंता निलेश बकाल यांनी वडाळा पाटबंधारे उपविभाग श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी संजय कल्हापूरे यांचेशी समक्ष चर्चा करुन केली आहे.

सध्या प्रवरा डावा कालव्याव्दारे पिण्याचे पाण्याचे आवर्तन घेण्यात येत आहे. मात्र कालव्याला ओझर बंधार्‍यात साचलेले पाणी सोडून आवर्तन घेतले जात आहे. सदरचे पाणी दुषित व खराब असल्याचे समक्ष पाहणी केली असता आढळून आले. सोडलेले पाणी पिण्यास योग्य नसून नागरिकांच्या आरोग्यास घातक आहे. वास्तविक पिण्याचे पाण्याच्या आवर्तनासाठी निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी मिळणे आवश्यक होते. तसे न करता ओझर बंधार्‍यात साचलेले पाणी सोडण्यात आले.

याबाबत ग्रामपंंचायतीच्यावतीने बेलापूर शाखेचे शाखाधिकारी यांना पत्राव्दारे अवगत करुन निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच उपविभागिय अभियंता श्री. कल्हापुरे यांचेशी समक्ष भेटून सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, श्रीरामपूर नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता निलेश बकाल, ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख, गावकरी पतसंस्थेचे संचालक महेश कुर्‍हे, शफिक शेख, सोमनाथ कदम, संदिप वाघमारे यांनी चर्चा करुन गांभिर्य लक्षात आणून दिले. याप्रश्नी लक्ष घालून कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. कल्हापुरे यांनी यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com