मुळा धरणातून उजव्या कालव्यासाठी आवर्तनाचे दरवाजे बंद

डावाही बंद; उजवा 38 दिवस तर डावा कालव्याचे आवर्तन 19 दिवस चालले
मुळा धरणातून उजव्या कालव्यासाठी आवर्तनाचे दरवाजे बंद

राहुरी (प्रतिनिधी) -

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मुळा धरणातून उजव्या कालव्यासाठी सोडण्यात आलेले रब्बी

हंगामातील आवर्तन काल रविवारी (दि.21) बंद करण्यात आले. तर डाव्या कालव्याचे आवर्तन शेतकर्‍यांची पाणी मागणी कमी झाल्याने यापूर्वीच बंद करण्यात आले आहे.

दरम्यान, डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे लाभक्षेत्राखालील 3 हजार हेक्टर क्षेत्र तर उजव्या लाभक्षेत्रातील 4 हजार 125 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या या आवर्तनामुळे राहुरी तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना जलसंजीवनी मिळाली. तर डाव्या कालव्यावरील आवर्तन मागणी कमी झाल्याने पाटबंधारे खात्याने याच आवर्तनातून सुमारे 189 दलघफूट क्षमतेच्या मुसळवाडी जलाशयात पाणी सोडले. त्यामुळे उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुसळवाडी जलाशयाची पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या 20 हजार 941 दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे. मुळा धरणाचा उजवा कालवा 38 दिवस तर डावा कालवा 19 दिवस चालला होता. गेल्या 38 दिवसात उजव्या कालव्याखालील रब्बी हंगामातील ऊस, कांदा, हरभरा, गहू, चारा पिके ओलिताखाली आल्याने ऐन उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर या पिकांना जीवनदान मिळाले आहे.

चौकटः राहुरी तालुक्यात सरासरीपेक्षा दामदुप्पट पाऊस झाल्याने यंदा मुळा दोनवेळा पूर्णक्षमतेने भरल्याने तसेच जायकवाडी धरणातही पुरेसा पाणीसाठा असल्याने मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याची टांगती तलवार पाटबंधारे म्यान केल्याने राहुरीच्या मुळा धरणातील लाभक्षेत्राला त्याचा पुरेपूर फायदा झाला. त्यामुळे आता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राहुरीच्या लाभक्षेत्राला पुरेसे आवर्तन मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com