दोन दिवसांत रोष्टरनुसार झेडपीच्या रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार!

भरतीसाठी खुल्या प्रवर्गाला 40 वर्षे तर मागास प्रवर्गासाठी 45 वर्षांची वयोमर्यादा जाहीर
दोन दिवसांत रोष्टरनुसार झेडपीच्या रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी या महिनाअखेर अथवा पुढील महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिध्द होणार आहे. यादृष्टीने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या हालचाली झाल्या सुरू असून जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गातील (वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबतचा अध्यादेश 15 मे 2023 रोजी प्रसिध्द झाला आहे.

यात झेडपीच्या भरतीसाठी डिसेंबर 2023 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 40 आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे करण्यात आली आहे. दरम्यान, नगर जिल्हा परिषदेच्या मंजूर रोष्टरनुसार दोन दिवसांत रिक्त जागांचा तपशील मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांपैकी चार विभागांचे रोष्टर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तपासणी करण्यात आले असून त्याला आज अथवा उद्या (दि. 18 मे) रोजी मान्यता मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकहून रोष्टर तपासून परत येणार्‍या झेडपीच्या दोन कर्मचार्‍यांचा अपघाती मृत्यू झाल्याने दोन विभागांच्या रोष्टरला मंजुरी बाकी होती. यासह अन्य दोन अशा चार विभागांच्या रोष्टरला दोन दिवसांत मान्यता मिळणार असल्याने नगर जिल्ह्यातील झेडपीच्या रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे.

दरम्यान, रिक्त जागा अंतिम झाल्यावर झेडपीचा सामान्य प्रशासन विभाग राज्य शासनाच्या मान्यतेने भरतीसाठी या महिनाअखेर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिध्द करणार आहे. दुसरीकडे होणार्‍या संभाव्य भरतीसाठी ग्रामविकास विभागाने सोमवार (दि.15 ) रोजी सविस्तर अध्यादेश काढला आहे. यात भरतीमधील उमेदवारांच्या वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत. कोविडमुळे दोन वर्षे वाया गेल्याने जिल्हा परिषद भरतीसाठी इच्छुक असणार्‍या उमदेवारांसाठी दोन वर्षे वयोमर्यादा वाढवण्यात आली आहेत.

यात डिसेंबर 2023 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 40 आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे करण्यात आली आहे. याचा लाभ संबंधीत उमेदवारांना होणार आहे. यासह भरतीसाठी राबवण्यात येणारी कार्यप्रणाली, ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षा, त्यांची गुणवत्ता यादी, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, पेसा (अनुसूचित क्षेत्रातील) सरळसेवा पदांबाबत, भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश याबाबतची कार्यप्रणाली ग्रामविभागाने निश्चित केली असून जिल्हा निवड समितीच्यावतीने राबवण्यात येणार्‍या या भरतीवर विभागीय महसूल आयुक्त यांचे नियंत्रण राहणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com