रोजगार हमीच्या समृध्दी आराखड्यात 3 लाख 31 हजार कामांना मंजुरी

सार्वजनिक गोदाम, जनावरांसाठी गोठे यासह अन्य कामांचा समावेश
रोजगार हमीच्या समृध्दी आराखड्यात 3 लाख 31 हजार कामांना मंजुरी
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महात्मा फुले रोजगार हमी योजनेच्या 2022-23 या आर्थिक वर्षातील समृध्दी आराखड्याला जिल्हा परिषद स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. या योजनेत यंदा विक्रमी 3 लाख 30 हजार 933 कामांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे रोजगार हमी आयुक्त राज्य सरकार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. यंदाच्या रोहयोच्या आराखड्यात पहिल्यांदा नाविण्यपूर्ण कामे म्हणून जनावरांसाठी गोठे बांधणे, गावाच्या मागणीनुसार त्या ठिकाणी सार्वजनिक जागेवर गोदाम बांधणे, शाळा अंगणवाड्यांना सरंक्षक भिंतीसह इमारती बांधण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहयो विभागाच्या उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक रेश्मा होजगे यांनी हा आराखडा तयार केला आहे. यात 3 लाख 30 हजार 933 कामांचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी सुमारे 3736 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यातून जिल्ह्यात साडेसात कोटींहून अधिक मनुष्यदिन निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासनातर्फे मी समृद्ध, तर गाव समृद्ध या धोरणांतर्गत लखपती कुटुंब या संकल्पनेवर आधारित रोहयोचे हे लेबर बजेटचे रूपांतर समृद्धी बजेटमध्ये करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत आता रोजगार हमीवर पाहिजे ते काम, लागेल तेवढे काम, तसेच वैयक्तिक लाभाच्या एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ देऊन प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

2022-23 साठी रोजगार हमीवरील प्रस्तावित कामांचा आराखडा जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागाकडून तयार केला आहे. त्यात अ वर्गात जलसंधारणविषयक सिमेंट नाला बांध, दगडी नाला बांध, गॅबियन बंधारे, शोषखड्डे, सार्वजनिक शोषखड्डे, सलग समतल चर, पाझर तलाव दुरूस्ती, जमीन सपाटीकरण, गाळ काढणे, वनीकरण, रस्तादुतर्फा वृक्षारोपण, रोपवाटिका अशी एकूण 59 हजार 951 कामे असून त्यासाठीचे 478 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. याशिवाय ब वर्गात सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर, शेततळे, फळबाग लागवड, रेशीम उत्पादन, बांधावरील वृक्ष, घरकूल, सामूहिक गोठे, मत्स्यपालन अशी 2 लाख 24 कामे प्रस्तावित असून त्याचे अंदाजपत्रक 2236 कोटींचे आहे. व्हर्मी कंपोस्ट, अझोला उत्पादन यासाठीची 24 हजार 896 कामे असून त्यासाठी 60 कोटींचे अंदाजपत्रक आहे. तर क वर्गात शौचालय, रस्ता खडीकरण, मुरमीकरण, सिमेंट रस्ता, डांबर रस्ता, ग्रामसंघ इमारत, बाजार ओटा, स्मशानभूमी शेड, सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण आदी कामेही प्रस्तावित आहेत.

ड वर्गात नाविन्यपूर्ण कामे

पुढील वर्षी ड वर्गात मोडणार्‍या नावीन्यपूर्ण योजनेत गुरांचा गोठा, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, नापेड कंपोस्ट, सार्वजनिक जागेवरील गोदाम, शाळा, अंगणवाडीकडे जाणारा रस्ता, खेळाचे मैदान, शालेय स्वयंपाकगृह, शालेय संरक्षक भिंत, अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे प्रस्तावित आहेत.

जिल्ह्यात आता रोहयोतून 87 हजार 600 जनावरांचे गोठे, 93 हजार शेळी पालनासाठी शेड, 17 हजार कुक्कटपालन शेड, 114 ठिकाणी सार्वजनिक गोदाम 278 ठिकाणी खेळांचे मैदान, 29 शाळा आणि अंगणवाड्यांना रस्ते, 775 ठिकाणी शाळांवर रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा, 260 अंगणवाडी बांधकामे, नव्याने चालू वर्षात 1 हजार 88 ठिकाणी शाळा अंगणवाड्यांना इमारती बांधण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com