रोजगार हमीतून लक्षाधीश होण्याची संधी !

मागेल त्याला काम ऐवजी उत्पन्न मिळेल ती कामे करण्याची संधी
रोजगार हमीतून लक्षाधीश होण्याची संधी !

अहमदनगर | ज्ञानेश दुधाडे| Ahmednagar

रोजगार हमीतून आता मागेल त्याच्या हाताला कामाऐवजी शाश्वत उत्पन्न मिळून प्रत्येक शेतकरी लक्षाधीश कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे आता शेतकर्‍यांना रोजगार हमीतून लक्षाधीश होण्याची संधी निर्माण करून देण्यात आली आहे. रोहयोच्या या नवीन योजनेत मी समुध्द, तर गाव समुध्द आणि गाव समुध्द झाला तर राज्य समुध्द होण्यास वेळ लागणार नाही, ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे.

रोजगार हमीच्या या नवीन संकल्पनेत राज्यातील प्रत्येक तालुक्यातून दहा गावाची निवड करण्यात येणार आहे. याच धर्तीवर जिल्ह्यातून 14 तालुक्यातून प्रत्येकी दहा गावांची निवड करण्यात येणार आहे. यात तालुक्याची मागणी असल्यास दहापेक्षा जास्त गावांची निवड करता येणार आहे. मात्र, किमान दहा गावांची निवड ही अट आहे. त्यानंतर निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावातून प्रत्येकी किमान 100 शेतकरी यांची निवड करण्यात येणार आहे. या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या विकासासाठी आणि शाश्वत उत्पन्नासाठी गरज असणारी कामे रोहयातून शंभर टक्के पूर्ण करण्यात येणार आहेत.

यात निवड झालेल्या शेतकर्‍याला फळबाग योजना, जनावरांचा पक्का गोठा, कुकटपालन, नवीन विहीरींची खोदाई, शेताच्या बांधावर वृक्ष लागवड, शेततळे, शेततळ्याचे अस्तिरिकरण यासह अन्य काम करता येणार आहे. यासाठी रोहयोतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संकल्पनेत संबंधीत शेतकर्याला वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये कसे मिळले, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महात्मा गांधी ग्रामीण योजनेंतर्गत 65 टक्के खर्च कृषी व कृषी निगडीत बाबींवर करावयाचा आहे.

तसेच झाल्यास ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाना लक्षाधीश बनविणे शक्य आहे. रोहयोतील मृदा व जलसंवर्धनची सर्व कामे कृषी निगडीत आहेत. तसेच जलसंधारणाची कामे ज्यात सलग समतलचर, गैबियन बंधारे, विविध प्रकारचे नाला बांध, विहीर, विविध प्रकारचे शेततळे आदी याशिवाय शोषखड्डे, रेनवाटर हार्वेस्टिंग हे पण जलसंधारणाशी निगडीत आहेत. कृषी निगडीत अन्य कृर्तीमध्ये पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन बाजाराचा ओटा, गोडाऊन, पाणंद व शेतरस्ते, गाव रस्ते हे कृषीशी निगडीतच आहेत.

शेती म्हणजे पेरणी ते काढणी एवढेच समजणारे बरेच लोक आहेत. सद्य:स्थितीत माणसाचे प्रत्येक काम पैशापासून सुरु होऊन पैशामध्येच संपते. यात शेती अपवाद नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. काही लोकांना वाटते की शेतकरी अन्न पिकवतो, हे जरी खरे असले तरी बरेच शेतकरी अशी पिक घेतात ज्यांची उत्पादकता त्यांच्या शेतात कमी असते. काही पिकांना बाजारात बरोबर भाव मिळत नाही, तरीही शेतकरी तिच पिके घेतात.शेतकर्यांना लक्षाधीश करावयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात हे बिंबवावे लागेल की ते शेती पैसे कमावण्यासाठी कष्ट करत आहेत.

पिकं कोणतेही असोत, शेतकर्याला त्याच्यातून नफा मिळायला पाहिजे. यामुळे यापुढे रोहयाचे लेबर बजेट तयार करतांना शेती, शेतीचे (पेरणी पूर्व) व शेतीचे (कापणीनंतर) च्या सर्व बाबींचा समर्पक विचार करावा. तर ते लेबरबजेट समृध्दी बजेटमध्ये रुपांतरीत होईल. तरच शेतकरी समृध्द होईल. समृध्दीला मोजण्यासाठी लक्षाधीश शब्द वापरण्यात येत आला असल्याच्या रोहयोच्या नवीन संकल्पनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com