अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या नियोजन विभागाने आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा

भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक उपयोग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी, अंगणवाडी सेविकांना आवश्यक कामे 2021-22 च्या मनरेगा जिल्हा आराखड्यात सूचवण्यास शासनाने कळविले आहे.

राज्याच्या नियोजन (रोजयो) विभागाने याबाबतचा हा शासन निर्णय काढला आहे. राज्यातील बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेतात. त्यांच्यासह इतरांनाही शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असणे आवश्यक आहे. त्यामळे हा परिसर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुंदर बनवणे शक्य आहे.

अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यातील जैतादेही गावातील जिल्हा परिषद शाळेने याबाबतचे नियोजन केले असून पुढील वर्षीसाठी सुमारे दीड कोटींच्या कामाचा आराखडा सादर केला आहे. त्याच जैतादेही पॅटर्नच्या धर्तीवर इतर जिल्ह्यांतील शाळांचा भौतिक विकास करणे शक्य आहे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

या नवीन योजनेच्या उद्देशाबाबत शासन निर्णयात स्पष्टीकरण देण्यात आले असून यात अकुशल मजुरी रोजगार उपलब्ध करून देणे, गावात शाश्वत मालमत्ता तयार करणे, वृक्षलागवडीने परिसर हिरवागार होण्यास मदत, गांडूळ खत परिसरातील झाडांना फायदेशीर, विद्यार्थ्यांना सेंद्रीय खताची ओळख, रेन वॉटर हारवेस्टिंगमुळे मुलांना पाणीबचतीचे ज्ञान, मनरेगातून काम झाल्याने शाळा, तसेच ग्रामपंचायतीच्या खर्चात बचत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच कामे सादर करावयाच्या पध्दतीमध्ये जी कामे प्रस्तावित करायची आहेत, त्या कामांचा समावेश पुढील वर्षीच्या(2021-22) मनरेगा जिल्हा कृती आराखड्यात करावा. त्यासाठी मुख्याध्यापक, अंगणवाडीताईंनी कामांची यादी तयार करून ग्रामपंचायतला द्यावी, ग्रामसेवक त्याचा समावेश मनरेगा कृती आराखड्यात करतील.

आता रोजगार हमीतून ही कामे होणार

जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी किचन शेड बांधणे, शाळा, अंगणवाडीच्या इमारतीसाठी रेन वॉटर हारवेस्टींग संरचना उभारणे, परिसरात शोषखड्डा, मल्टी युनिट शौचालय बांधणे, खेळाचे मैदान, संरक्षक भिंत, वृक्ष लागवड, पेव्हींग ब्लॉक, काँक्रिट नाली बांधकाम, शाळांकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे यासह बोअरवेल, पूनर्भरण, गांडूळ खत प्रकल्प, नाडेप कंपोस्ट या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.