2 हजार 275 अपंगांची ‘रोहयो’कडे धाव

रोजगारासाठी जिल्हा परिषदेकडे केली नोंदणी
2 हजार 275 अपंगांची ‘रोहयो’कडे धाव

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना महामारीतील लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा (अपंग) रोजगार बुडाला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने अपंग व्यक्तींना रोजगार हमी योजनेतून सुलभ काम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी विभागाकडे 2 हजार 275 अपंगांनी नोंदणी केली. या सर्वांना आता रोहयोच्या माध्यमातून सुलभ रोजगार मिळणार आहे.

दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, त्याचसोबत त्यातून शाश्वत कामे उभी रहावीत, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) शासनाने सुरू केली.

या योजनेतून मागेल त्याला किमान 265 दिवसांचा तर केंद्र सरकारकडून 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात रोहयोची 1 हजार 640 कामे सुरू असून त्याठिकाणी जिल्हा परिषद आणि यंत्रणा मिळून 8 हजार 235 हजार मजुरांची उपस्थित आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्वच यंत्रणा ठप्प असल्याने रोजगार हमीवरील कामेही थांबली होती. लॉकडाऊनचा हा फटका सर्वांनाच बसला. अनेकांचे हक्काचे रोजगार हिरावले गेले. त्यातही दिव्यांग व्यक्तींची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे शासनाने दिव्यांगांची होणारी उपासमार थांबवण्यासाठी त्यांना रोहयोवर कामे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

शासनाच्या अपंग आयुक्तालयाकडून 8 मे रोजी याबाबतचे परिपत्रक विभागीय आयुक्त व तेथून प्रत्येक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले होते. त्यानुसार अपंगांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन अपंगांची नोंदणी रोहयोच्या कामासाठी करण्यात आली.

या गरजू दिव्यांगांचा शोध घेऊन त्यांना हक्काचा रोजगार देण्याच्या दृष्टीने जॉबकार्ड तयार करावे व सुलभ कामे उपलब्ध करून द्यावीत, असे परिपत्रकात म्हटले आहे. त्याप्रमाणे गेल्या तीन महिन्यांत 2275 अपंगांनी रोजगार हमीसाठी नोंदणी केली आहे. त्यातील 64 जणांनी काम मागणी केली असून त्यांना कामे देण्यात आली आहेत. सध्या रोजगार हमीवर 238 रूपये रोज दिला जात आहे.

अशी आहे नोंदणी

कोपरगाव 96, कर्जत 322, अकोले 15, जामखेड 15, नगर 469, नेवासा 141, पारनेर 244, पाथर्डी 223, राहाता 198, राहुरी 9, संगमनेर 39, शेवगाव 187, श्रीगोंदा 119, श्रीरामपूर 198 असे एकूण 2 हजार 275 आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com