रोहयोअंतर्गत साठवणुकीसाठी कांदाचाळ

1 लाख 60 हजारांचे अनुदान मिळणार
रोहयोअंतर्गत साठवणुकीसाठी कांदाचाळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार 367 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक नियोजन विभाग, रोहयो प्रभाग यांच्यावतीने जारी करण्यात आले आहे.

खरीप हंगामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा हंगामातील कांदा साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो.

कांदा हे एक जिवंत पीक आहे. त्याचे मंदपणे श्वसन चालू असते. तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. त्यामुळे कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कांदाचाळच्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक असते.

अकुशल 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च, कुशल 40 टक्केच्या मर्यादेत 64 हजार 147 रुपये इतका खर्च असा मनरेगा अंतर्गत मजुरी अधिक साहित्याचा खर्च एकूण 1 लाख 60 हजार 367 रूपये (एक लक्ष साठ हजार तीनशे सदुसष्ठ) इतके अनुदान मिळणार आहे. उर्वरित रक्कम 2 लाख 98 हजार 363 रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदाचाळीसाठी एकूण खर्च - 4 लाख 58 हजार 730 रुपये येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com