20 दिवसात निम्म्याने घटले रोहयो मजूर

करोनाचा परिणाम : सद्यस्थितीत 1 हजार 823 कामांवर 8 हजार 300 मजूर
20 दिवसात निम्म्याने घटले रोहयो मजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झालेला आहे. तसा तो रोजगार हमी योजनेवही होत आहे. गेल्या 20 दिवसांत रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या निम्म्याने घटल्याचे समोर आले आहे. सध्या 1 हजार 823 कामांवर 8 हजार 273 मजूर काम करत आहेत. हिच संख्या मार्चअखेर 3 हजार 278 कामांवर 15 हजार 549 मजूर एवढी होती.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण भागात गरजूंना 100 दिवसांचा हक्काचा रोजगार दिला जातो. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात 3 हजार 278 कामे सुरू होती. त्यावर 15 हजार 549 मजूर काम करत होते. यात ग्रामपंचायत विभागात 2 हजार 519 कामांवर 10 हजार मजूर, तर यंत्रणेच्या 759 कामांवर 5 हजार 531 मजूर काम करत होते.

यात घरकुलाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याशिवाय शोषखड्डे, रस्त्याची कामे, फळबागा कामे या कामांचा समावेश होता. परंतु एप्रिलपासून कोरोना रूग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे 15 एप्रिलपासून शासनाने कडक निर्बंध लावले. परिणामी रोहयो मजुरांची संख्याही घडली. यात बांधकाम साहित्याची दुकाने बंद असल्याने बांधकामांवर परिणाम झाला. परिणामी घरकुलांची कामेही थांबली.

चालू आठवड्यात कामांची संख्या, तसेच मजुरांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. चालू आठवड्यात 1 हजार 823 कामांवर 8 हजार 273 मजूर काम करत आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या 1 हजार 601 कामांवर 6 हजार 188 मजूर, तर यंत्रणेच्या 222 कामांवर 2 हजार 25 मजुरांचा समावेश आहे.

आणखी मजूर घटण्याची शक्यता

सध्या असलेल्या 8 हजार मजूर संख्येतही पुढील काळात आणखी घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे. कारण रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागातही रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय उन्हाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सध्याची रूग्णसंख्या आणखी कमी होऊ शकते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com