शेतकर्‍यांचे रोहित्र बंद करू नका - सत्यजित कदम

शेतकर्‍यांचे रोहित्र बंद करू नका - सत्यजित कदम

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे वीज रोहित्र बंद कराल तर याद राखा, असा सज्जड इशारा भाजयुमो दक्षिण जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी महावितरणला दिला आहे.

कदम यांनी सांगितले, बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला असताना महावितरणने वीजबिलावरुन शेतकर्‍यांच्या रोहित्र बंद करण्याचा सपाटा सुरु केला आहे. अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची मदत करण्याऐवजी महावितरणला वीजबिल वसूलीचे सरकार आदेश देत आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतीपंपाला पूर्ण वीजमाफी व शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करु हे आश्वासन महाआघाडी सरकारने दिले होते. मात्र, याचा त्यांना विसर पडला आहे.

हातात पैसा नसल्याने व कुठल्याही प्रकारची शासकीय मदत न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी काळी दिवाळी साजरी केली. आज शेतकर्‍यांच्या खिशात दमडी नसतांना वीजबिल भरण्याचा तगादा लावला आहे. बिल न भरल्याने वीज रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला आहे. महावितरणने अगोदर शेतीसाठी चोवीस तास पूर्णदाबाने अखंडीत वीजपुरवठा करावा. प्रत्येक डिपीवर वायरमनची नेमणूक करावी. शेतकर्‍यांना आधी सुविधा पुरवा मगच बिलाची मागणी करा.

महावितरणने जर वीज रोहित्र बंद करण्याचे थांबवले नाही तर भाजयुमोच्यावतीने जिल्हाभर महावितरण विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल. यामध्ये महावितरणच्या कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना घेरावो घालून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजयुमो दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com