रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान

महावितरणकडून सामूहिक पंचनामे सुरू
रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे विद्युत 
उपकरणे जळून लाखोंचे नुकसान

बेलापूर |वार्ताहर| Belapur

येथील शिवनेरी गल्लीत असणार्‍या वीज पुरवठा करणार्‍या रोहित्रात (डी. पी.) झालेल्या तांत्रीक बिघाडामुळे या भागात वीज पुरवठा असणार्‍या ग्राहकांचे फ्रिज, पंखे, हिटर, गिझर, पाण्याच्या मोटारी, मोबाईल अशी विद्युत उमकरणे जळाली. या घटनेत नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, महावितरणने नुकसानीचे सामूहिक पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहेत.

बेलापुरातील शिवनेरी गल्लीत बसविण्यात आलेल्या रोहित्रात शनिवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक बिघाड झाला. आर्थिंंगची वायर कट झाल्यामुळे अचानक विजेचा दाब वाढला. त्यामुळे या रोहित्रावरून वीज पुरवठा होणार्‍या नवले गल्ली, अरुणकुमार वैद्य पथ, काळे गल्ली, शिवनेरी गल्ली, धनगर गल्ली येथील वीज ग्राहकांच्या घरातील विजेची उपकरणे पेटली. या भागातच पाणी पुरवठा असल्यामुळे सर्वांच्या वीज मोटारी सुरू होत्या. त्यामुळे अनेकांच्या मोटारीही जळाल्या. काहीचे चार्जींगला लावलेले मोबाईल, फ्रिजही जळाले. येथील जयराम शेळके आजारी असल्याने त्यांनी आरामदायक सव्वा लाख रुपयांची गादी आणली होती. तीही यावेळी जळाली.

याची माहिती समजताच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी घरोघर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे नुकसान झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महावितण अधिका़र्‍यांशी संपर्क साधला. महावितरण अधिकार्‍यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून घरोघर जाऊन पंचनामे सुरू केले असून महावितरणचे सहाय्यक अभियंता मिलिंद दुधे, मधुकर औचिते, स्वप्निल पाटील यांनी घरोघर भेट देत नुकसानीचा आढावा घेतला.

वीजपुरवठा खंडित असल्यामुळे किती नुकसान झाले याचा अंदाज येऊ शकत नसला तरी घरातील सर्व विजेची उपकरणे जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशा घटनेत महावितरणकडून सामूहिक पंचनामे करण्याची ही बेलापुरातील पहिलीच घटना आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्यावरच नुकसानीचा खरा अंदाज येईल, असे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com