रोहित्र जळाल्याने सुरेशनगर ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ

15 दिवसात रोहित्र तीनदा जळाल्याने गाव अंधारात
रोहित्र जळाल्याने सुरेशनगर ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ

नेवासा फाटा |प्रतिनिधी| Newasa Phata

नेवासा तालुक्यातील आदर्श गाव सुरेशनगर येथे गेला महिनाभर पाण्यासाठी भटकंती सुरु होती. ना.शंकरराव गडाख यांचे आदेशानुसार गावाकाठचे पाझर तलाव मुळा पाटबंधारेच्या पाण्याद्वारे भरून घेतले. परंतु गेले 15 दिवसापासून गावठाण रोहित्र तिन वेळा जळाले. त्यामुळे घराजवळील बोअरवेल मोटारी बंद असलेमुळे महिलांना पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पाण्याचे फिल्टर, फ्रिज, गिरण्या बंद अवस्थेत आहेत. सुरेशनगर ग्रामपंचायतने वीज वितरण कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून रोहित्राची मागणी केली. त्याचे बिल सुद्धा भरले. परंतु रोहित्र भरताना त्यामधील ऑईल आणि कॉईल हलक्या दर्जाचे वापर केल्यामुळे लोड धरू शकत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा जळण्याच्या घटना घडत आहे.

रात्री कसेबसे सिंगल फेजवर कमी दाबाने चालवून अंधुक प्रकाशात गाव रात्र काढीत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

दोन दिवसात पूर्ण नवीन रोहित्र बसवून पूर्ण दाबाने गावात वीजपुरवठा झाला नाही तर सुरेशनगर येथील ग्रामस्थ वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन कंदील भेट देतील असा इशारा सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com