
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी नगर मनमाड. महामार्गावर निर्मळ पिंपरी येथील बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ दरोडाच्या इराद्याने शस्त्र साहित्यासह उभे असणार्या पाच ते सहा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त खबरीने दिलेल्या माहितीच्या आधारे 15 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या नगर येथील पथकाने केलेल्या कारवाईत पाच जणांना जेरबंद करुन पकडले आहे. तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
आरोपींकडून टाटा कंपनीचा सुमो एम.एच. 15 डी. एम. 1833, पाच लाख रुपये किंमतीचा पांढरा सुमो तसेच लोखंडी कोयता, सुती दोरी, स्क्रू ड्रायव्हर, लाल मिरची पावडर, आदी साहित्यही जप्त करण्यात आले आहे. दरोडे टाकण्याच्या तयारीत असणारे अजय राजू भोसले वय 25 (रा.शिर्डी), अमोल अविनाश कुंदे वय 19 (रा.एकरुखे), साईराम राजु गुडे वय 23 (रा.शिर्डी), योगेश किशोर कांबळे वय 19 (रा.शिर्डी), सुमित नरेश चेहरा, वय 16 (रा.शिर्डी) यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने गुप्त माहिती मिळताच तेथे तात्काळ जाऊन मोठ्या शिताफिने पकडले असून सतिश बाबासाहेब खरात हा आरोपी मात्र पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत पळून गेला आहे.
मात्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या 5 तरुणांना जेरबंद करण्यात आले आहे. एकजण पसार आहे. हे सर्व तरुण शिर्डी येथील असल्याने शिर्डी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप कचरू पवार, पोलीस कॉन्स्टेबल आकाश राजेंद्र काळे, सरकारी वाहन चालक संभाजी कोतकर, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांच्या पथकाने सापळा रचून पकडले असून या आरोपींविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 266/23 नुसार शस्त्र अधिनियम 25 (4) भादंवि कलम 399/402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तरुणांवर या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत का त्याच्या सहवासात असणारे व पाठबळ देणारे यांचा देखील शोध घेतला पोलीस घेत असून त्यांच्या जवळ सापडलेल्या मोबाईल सी.डी.आर. च्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे देखील तपास केला जाणार असून या तपासात अधिक गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.