आळेफाटा येथे पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

मोक्कातील फरार आरोपी अंकुश पवारचा आरोपीत समावेश
आळेफाटा येथे पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

घारगाव |वार्ताहर| Ghargav

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली. यामध्ये मोक्कातील फरार आरोपी अंकुश खंडू पवार (तांबवाडी ता. पारनेर जि. अहमदनगर) याच्यासह चौघांना ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार झाले. नगर-कल्याण महामार्गावरील आळे (जुन्नर) शिवारात सोमवारी (दि.9) पहाटे ही कारवाई करण्यात आली. तर पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथील एका पेट्रोल पंपावर सराइत चोरट्यांची टोळी दरोडा टाकणार असल्याचे तपासात उघड झाले असून आरोपींनी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच व पारनेर अहमदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

नवनाथ राजू पवार (वय 21, रा. ढोकी, पारनेर जि. अहमदनगर), अनिकेत बबन पवार पवार (वय 20, रा. साळवाडी, ता. जुन्नर), अंकुश खंडू पवार (रा. तांबवाडी वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर), प्रवीण दत्तात्रय आंबेकर (वय 25, रा. तांबवाडी वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून अमोल कैलास शिंदे (वय 21, रा. धोत्रे, पारनेर जि. अहमदनगर), विकास बर्डे (रा. लाखणगाव, ता. आंबेगाव जि. पुणे), विशाल खंडू पवार (रा. तांबवाडी वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर) अशी फरार आरोपींची नावे आहेत.

याबाबत आळेफाटा पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिलेली माहिती अशी की, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आळे गावाच्या हद्दीतील बोरीफाटा येथे आळेफाट्याकडे जाणारे संशयित वाहने चेक करण्याचे काम सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चालू होते. दरम्यान आळेफाटा बाजूला ओमिनी एम. एच 14 ए. जी 7203 भरधाव वेगाने गेली. पथकाला संशय आल्याने ओमिनीचा पाटलाग केला. आरोपींना अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेच्या उसाच्या शेतात आश्रय घेतला. मात्र पोलीस पथकाने शोध घेत चार जणांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नवनाथ राजू पवार, अनिकेत बबन पवार पवार, अंकुश खंडू पवार, प्रवीण दत्तात्रय आंबेकर अशी आपली नावे सांगितली. तर तिने आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

दरम्यान आळेफाटा पोलीस ठाण्यात पोलिसांनी दरोड्याची तयारी करीत असलेबाबत भा.द.वी कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक चार आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपासाला गती दिली. पुढील तपासात आरोपी अंकुश खंडू पवार हा कल्याण जिल्हा ठाणे तालुका पोलीस ठाणे येथून गेल्या एक वर्षापासून मोक्कातील फरार आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी संघटीत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तर पारनेर जि. अहमदनगर पोलीस स्टेशन हद्दीत तीन अशा आठ गुन्ह्याची काबिली दिली असून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे. फरार तीन आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.

पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस हवालदार चंद्रा डुंबरे, लहानू बांगर, विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पद्मसिंह शिंदे, मोहन आनंदगावकर, होमगार्ड सागर भोईर, पोलीस मित्र नामदेव पानसरे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

Related Stories

No stories found.