कोठेवाडीत दहा मिनिटात घरात घुसलेले चोरटे जेरबंद

पोलीसांच्या प्रात्याक्षिकमुळे भांभावलेल्या ग्रामस्थांनी टाकला सुटेकचा निश्‍वास
कोठेवाडीत दहा मिनिटात घरात घुसलेले चोरटे जेरबंद

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

गावात दुर्घटना घडल्यास याची माहिती ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या (Village security systems) मदतीने ग्रामस्थ व पोलिसांना (Police) कळवल्यास घटनास्थळी पोलीस पथक व ग्रामस्थ किती लवकर पोहचू शकते, याचे प्रात्यक्षिक तालुक्यातील कोठेवाडी (Kothewadi) येथे सादर करण्यात आले.

या प्रात्यक्षिकात दोन पोलीस कर्मचारी स्वतः चोरटे बनून कोठेवाडीतील एका घरात शिरले. या घटनेची माहिती घराच्या शेजारील व्यक्तीने ग्रामसुरक्षा यंत्रणेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर दिल्यानंतर त्या ठिकाणी अवघ्या दहाच मिनिटात पोलीस पथक व ग्रामस्थ दाखल झाले व चोरटे बनलेल्या पोलिसांना ताब्यात घेतले. या प्रात्यक्षिकाची कल्पना कोठेवाडीच्या ग्रामस्थांना अगोदर न दिल्याने त्यांची चांगलीच धांदल उडाली. मात्र खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

याबाबत अधिक माहिती अशी, एखाद्या गावात दुर्घटना घडल्यास या घटनेची माहिती एकाच वेळी दुर्घटना घडलेल्या गावातील ग्रामस्थ व पोलिसांना समजावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने डी. के. गोर्डे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित केली आहे. या योजनेत सहभागी झालेल्या गावात एखादी दुर्घटना घडल्यास ग्रामसुरक्षा यंत्रणेने दिलेल्या क्रमांकावर त्याची माहिती दिल्यास ही माहिती एकाचवेळी त्या गावातील सर्व मोबाईलधारक व पोलिसांना समजते व घटनास्थळी ग्रामस्थ व पोलीस हजर होतात.

या घटनेचे प्रात्यक्षित दाखवताना दोन पोलीस कर्मचारी स्वतःच चोर झाले व त्यांनी कोठेवाडीतील एका घरात प्रवेश केला. या घटनेची माहिती शेजारील ग्रामस्थाने दिलेल्या क्रमांकावर दिल्यानंतर ही माहिती कोठेवाडीच्या ग्रामस्थांना व पोलिसांना समजताच ज्या घरात चोरटे बनलेले पोलीस शिरले होते. त्या घराला ग्रामस्थ व पोलिसांनी वेढा घालत चोरट्यांना बाहेर येण्याचे आवाहन केल्यानंतर हातात सत्तूर व काठी घेऊन हे चोरटे बाहेर आले व पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीत कोंबले. या चोरटयांनी पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याने ग्रामस्थांची काही काळ पाचावर धारण बसली होती. मात्र, त्यानंतर प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्या गोर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सर्व ग्रामस्थांना गावातील समाज मंदिरात बोलवत या घटनेची माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ अचंबित झाले.

या वेळी बोलताना गोर्डे म्हणाले, या योजनेत सहभागी झालेल्या गावात आत्तापर्यंत 48 हजार दुर्घटना घडल्या व त्यातील अठराशे आरोपीना अटक होऊन अनेकांना तातडीने शिक्षा सुद्धा झाल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा सर्वानी घेत या योजनेचा लाभ घ्यावा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर मुंडे म्हणाले, कोठेवाडीत दुर्घटना घडू नये, मात्र घडल्यास हातातील मोबाईलचा वापर करा पोलीस तात्काळ आपल्या पाठीशी ठाम उभे राहतील. या प्रात्यक्षिकात गोर्डे, मुंडे, चव्हाण यांचेसह सहायक पोलिस निरीक्षक कौशल्य वाघ, संजय डांगे, पोलीस कर्मचारी भगवान सानप, राहुल खेडकर, ईश्वर गर्जे, अतुल शेळके, एकनाथ बुधवंत, सरपंच दिगंबर चितळे हे सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com