दरोडा टाकणारी टोळी 24 तासात गजाआड

संगमनेर तालुका पोलिसांची कामगिरी, ट्रक व मुद्देमाल असा 62 लाखांचा ऐवज जप्त
दरोडा टाकणारी टोळी 24 तासात गजाआड

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील लोहारे शिवारात दोन दुचाकीवरुन आलेल्या पाच दरोडेखोरांच्या टोळीने 40 लाख 51 हजार 901 रुपये किमतीचे अ‍ॅल्युमिनीअम इग्नोटस भरलेला ट्रक असा 61 लाख 59 हजार 901 रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर तालुका पोलिसांनी करत अवघ्या 24 तासात पाच आरोपींना मालट्रक व मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

नकुल धर्मराज ठाकरे (वय 21, रा. शारदा नगर, कोपरगाव), आदिनाथ विलास गायकवाड (वय 19, रा. आश्वी बुद्रूक, कारवाडी, ता. संगमनेर), मारुती ठका बिडगर (वय 24, रा. बिडगर वस्ती डिग्रस, ता. संगमनेर), राजेंद्र सोन्याबापू खेमनर (वय 24, रा. आश्वी बुद्रूक पाराजवळ मांची रोड, ता. संगमनेर) समाधान देवीदास राठोड (वय 22, रा. करंजी, ह. रा. बोलकी, ता. कोपरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर गुन्ह्यात इतर तीन आरोपींचा व त्यांना मदत करणार्‍या आरोपींचा शोध सुरु आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमशेदपूर येथील शौर्य जवाहरलाल विग यांनी सुपे येथील मानवी अ‍ॅलॉय येथून 21.733 टन अ‍ॅल्युमिनीअम इंगोट्स खरेदी केले. त्याची 40 लाख 51 हजार 901 रुपये किमत आहे. सदरचा माल जमशेदपूर झारखंड येथे टाटा इंडस्ट्री येथे न्यायचा होता. त्याकामी त्यांनी अभिषेक कुमार रा. रांची यांच्या मालट्रक क्रमांक सीजी 04, एल पी 5601 हिच्यामधून सुपे येथून जमशेदपूरला नेण्यासाठी चालक अजितकुमार सुर्यदेव यादव व क्लीनर निपुकुमार शिवचरण यादव (दोन्ही रा. बिहार) यांना दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 वाजता माल भरला व तो एकूण 23 पॉलीथीनच्या बॅगमध्ये भरुन ट्रकमध्ये आणखी जागा शिल्लक राहिल्याने त्यात कांदा माल सिन्नर येथून भरावयाचा होता.

त्यामुळे ट्रक मालकाच्या सांगण्यावरुन चालक सुपे येथून पेट्रोलपंपावर मुक्कामी राहिला. दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3 वाजता सदरचा ट्रक सुपे येथून लोणी नांदूर शिंगोटे रोडने सिन्नरकडे जाण्यास निघाला असता लोहारे शिवारात दोन मोटारसायकलवरुन पाच आरोपी आले त्यांनी रस्त्यात मोटार सायकली आडव्या लावून ट्रक थांबविला. व त्यापैकी तीन आरोपींनी ट्रक मध्ये बळजबरीने घुसून चालक व क्लीनर यांना सुर्‍याचा धाक दाखवून त्यांना नाशिक जिल्ह्यातील दापुर येथे पुणे-नाशिक रोडवर नेवून ट्रकच्या खाली उतरवून मोटारसायकलवर बसविले व एक आरोपी ट्रकमध्ये थांबून राहिला व इतरांनी ट्रक चालक व क्लीनर यांना दापूर कडे जाणार्‍या रोडवर मतलबी मळा, हाडवळा येथे म्हाळू केदार यांच्या वाट्याने घेतलेल्या शेतात त्यांचे हातपाय बांधून तोंडास चिकटपट्टी बांधून दोरीने बाभळीच्या झाडाला बांधून टाकले. व ट्रक व मुद्देमालासह पोबारा केला.

त्यानंतर ट्रक चालक व क्लीनर यांनी त्यांना बांधलेली दोरी कशीबशी सोडवून पायी दापूर येथे गेले. तेथे स्थानिक नागरीकांना त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. नागरीकांच्या मदतीने त्यांनी वावी पोलीस स्टेशन येथे फोन केला. वावी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठले. माहिती घेवून चालक व क्लीनर यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आणून सोडले. त्यानंतर चालकाने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 350/2021 भारतीय दंड संहिता 395 प्रमाणे दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल बढे यांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दिली. त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वेगाने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सानप, पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल औटी, पोलीस नाईक फुरकान सेख, पोलीस नाईक बाबा खेडकर, डमाळे, घोलप, यमना जाधव, दातीर, चालक पोलीस नाईक मनोज पाटील यांच्या पथकाला तपासाबाबत सूचना केल्या.

घटना घडून 7 ते 8 तास झाले होते. संगमनेर ते घोटी परिसरातील सर्व हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप पोलिसांनी पिंजून काढले. दरम्यान पांढुर्ली जि. नाशिक येथील संजीवन पेट्रोल पंप येथे आरोपी यांनी लुटलेल्या ट्रकमध्ये डिझेल भरतानाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. तीच संशयाची सुई धरुन मुंबईच्या दिशेने तपास सुरु केला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी महाराष्ट्रातील अधिकार्‍यांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन माहिती तात्काळ प्रसारीत केल्याने राज्यात ठिकठिकाणी नाकेबंदी क़रण्यात आली. आणि त्यातच सदरचा ट्रक अलगदपणे शिळ डायघर, पोलीस स्टेशन मुंब्रा, ठाणे या पोलिसांनी पकडला.

दरम्यान ट्रक अडविल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. आरोपींनी तेथून पळ काढल्यावर ते भिवंडी येथे गेले. एका लॉजवर राहिले. पुन्हा तेथून ते पसार झाले. पोलीस मागावर होतेच. संगमनेर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने वरील पाचही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. यातील नकुल धर्मराज ठाकरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोपरगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये आठ गुुन्हे दाखल आहेत. तर समाधान देवीदास राठोड याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. या आरोपींना मुद्देमालासह 24 तासाच्या आत संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपींना मदत करणार्‍या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल औटी, पो. ना. फुरकान शेख, पो. कॉ. प्रमोद जाधव, पो. ना. बाबा खेडकर, डमाळे, घोलप, यमना जाधव, दातीर, सहाणे, पालवे, दहातोंडे, मनोज पाटील, सहाय्यक फौजदार वाघ, आय. ए. शेख, आहेर, शिंदे, शिरसाठ, गायकवाड यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com