सुपा l वार्ताहर l Supa

नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा टोलनाक्यासह जातेगाव घाटात गाड्या अडवून प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे.

याबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दि.२५ रोजी ४ वाजता रस्ता लुट प्रकरणी तपास चालू असताना जातेगाव घाटात न्यु बब्बी दा पंजाबी ढाबा येथे पुण्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर दोन मोटारसायकली त्यापैकी होंडा शाईन कंपनीच्या मोटारसायकलवर तीन इसम व हिरो होंडा स्प्लेंडर कंपणीच्या मोटारसायकलवर तीन इसम बसलेले आढळून आले. हे आरोपी सुपा पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या वर्णनाशी मिळते जुळते असल्याने व त्यांच्यावर संशय बळाविल्याने पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी सरकारी वाहन थांबवण्यास सांगितले व पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे,पो. कॉन्स्टेबल ठोंबरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पटेल व पोलीस हेडकॉन्स्टेबल खैरे यांनी खाली उतरून त्यांची चौकशी सुरू केली असता नयन राजेंद्र तांदळे (वय- २६ राहणार भिस्तबाग चौक अहमदनगर) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेला आढळून आला. जीन्सचे मागच्या खिशात तीन हजार रुपये व अक्षय तात्याराम चखाले नावाचे आधार कार्ड मिळून आले. दुसऱ्या इसमास त्याचे नाव विचारले असता विठ्ठल भाऊराव साळवे (राहणार झापवाडी ता.नेवासा) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या मागील खिशात दीड हजार रुपये व एक मिरची पुड आढळून आली. अक्षय बाबासाहेब ठोबरे (राहणार सावेडी) यांच्या खिशात मिरची पावडरची पुडी मिळून आली. त्यांच्याजवळ असलेल्या मोटर सायकलचे निरीक्षण करता ती होंडा शाइन कंपनी ची काळ्या रंगाची गाडी क्रमांक एम एच-१६ बीए ५६४० मिळून आली. चौकशी सुरू असताना स्प्लेंडरवर बसलेल्या तीन पैकी एक इसम अंधाराचा फायदा पळून जाण्यात यशस्वी झाला. दुसरी मोटारसायकल क्र.एम एच १६ ए्यु ३१७४ वरील दोन इसम शाहुल अशोक पवार (वय ३१), अमोल छगन पोटे (वय २८ दोघे राहणार सुपा, ता.पारनेर) यांच्या पॅन्टच्या खिशात मिरची पावडरची पूड आढळून आली. त्यातील शाहुल पवार याची अंगझडती मध्ये एक सुरा आढळून आला. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान पथकामध्ये उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, पो.हे. कॉन्स्टेबल खैरे, पटेल,पो.ना.खंडेराव शिंदे, अमोल धामणे,पो. कॉन्स्टेबल यशवंत ठोंबरे, होमगार्ड टकले, अतुल रोकडे या पथकाने धाडस दाखवत या पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले.पुढील तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे हे करत आहेत.