माजी सरपंचाच्या घरावर दरोडा

माजी सरपंचाच्या घरावर दरोडा

चाकूचा धाक दाखवत साडे नऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजारांची लूट

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

देवळाली येथील दरोड्यांचा तपास लागतो न लागतो तोच श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात निपाणीवडगावच्या माजी सरपंचाच्या घरात घुसून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत साडे नऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजार रोकड लुटली.

येथील माजी वनाधिकारी सुरेश दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांच्या घरावर हा दरोडा पडला. येथील वनाधिकारी दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांनी घटनेची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोनवरून कळविली. यावरून परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला असता त्यांनी तात्काळ धूम ठोकली. यावेळी श्री. दौंड यांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कळविली.

या घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस नाईक संजय दुधाडे, दत्तात्रय दिघे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पवार, किशोर जाधव, सुनील दिघे, पंकज गोसावी, राहुल नरवडे तसेच अहमदनगर येथील एलसीबी पथक पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

भाजपाचे शिवाजी दौंड यांचे चुलतबंधू वनाधिकारी श्री. दौंड व आशिष दौंड बंधू व पुतणे असल्याने त्यांनी सदर दरोडेखोरास तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com