कांगोणी शिवारात दरोड्याच्या तयारीतील तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद

6 दिवसांची पोलीस कोठडी; शिंगणापूर पोलिसांची कामगिरी; तिघेही आरोपी जामखेड तालुक्यातील
कांगोणी शिवारात दरोड्याच्या तयारीतील तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद

सोनई |वार्ताहर| Sonai

शिंगणापूर पोलिसांनी चोरी घरफोडी, दरोडा, खून अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या जामखेड येथील तिघा सराईत गुन्हेगारांना नेवासा तालुक्यातील कांगोणी शिवारातून गुरुवारी रात्री अटक केली. या तिघांनाही नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना गुप्त माहिती मिळाली की, नगर-औरंगाबाद रोडवर शिंगणापूर फाट्याजवळ चांद्याकडे जाणार्‍या रस्त्यावर कांगोणी शिवारात पाच ते सहा इसम संशयितरित्या बसलेले आहेत. या माहितीवरून कर्पे यांनी पोलीस पथकासह छापा टाकून तीन आरोपींना जेरबंद केले बाकी आरोपी अंधाराचा व काटवनाचा फायदा घेत पळून गेले.

अटक केलेल्या आरोपींमध्ये अमोल जालिंदर काळे (वय 26) रा. राजेवाडी ता. जामखेड, खंडू उर्फ किरण रावसाहेब काळे (वय 25) रा. मिलिंदनगर ता. जामखेड व विकी मिलिंद घायतडक (वय 31) रा. आरोळेवस्ती ता. जामखेड या तिघांचा समावेश आहे. या आरोपींकडून लाल रंगाची सुझुकी मोटरसायकल (एमएच 12 एटी 3969) व एक चाकू, लाल मिरचीची पूड, एक लोखंडी गज असा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस नाईक बापू कान्हू फुलमाळी यांच्या फिर्यादीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 7/2022 भादवि कलम 394, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे करत आहेत.

आरोपींवर शनीशिंगणापूरसह जामखेड, परांडा (जि. उस्मानाबाद), लोणंद, सासवड, वडगाव निंबाळकर (जि. पुणे), नेणूनकर, आष्टी, अंबाजोगाई (जि. बीड) येथे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्पे यांनी सांगितले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, हवालदार श्री. माळवे, मोकाटे, फुलमाळी, शेख, वाघ, हिवाळे, गोरे, टेमकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com