दरोडा, घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद

दरोडा, घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यामध्ये दरोडा व घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्यांत असणार्‍या सराईत फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सचिन विजय काळे (रा. शेवगाव, पाथर्डी रोड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील ज्ञानेश्वर लोढे यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. यात 16 जूनला त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील व्यक्ती घराबाहेर झोपलेले असताना अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. तसेच 19 जूनला शोभाबाई झंज (रा. हातगाव ता. शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत कुटुंबातील व्यक्ती जेवण करून घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने घराचा आतून असणारा दरवाजा उघडून घरात प्रवेश करून पतीला मारहाण करत घरातील अन्य लोकांना धमकावून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 2 लाख 42 हजारांचा ऐवज लुटून नेला होता.

या दोन्ही घटनांबाबात शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याच्या तपासामध्ये सचिन विजय काळे (रा. शेवगाव, पाथर्डी रोड), हा आरोपी असल्याचे समोर आले. मात्र, तो पसार झाला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती. त्यात फरार आरोपी काळे हा नगर येथे येणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी सापळा लावून आरोपी काळेला नगर शहरातून अतिशय शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी काळे याच्या विरोधात गंगापूर, नगर एमआयडीसी, तोफखाना, शेवगाव पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com