केडगावात दोन ठिकाणी घरफोड्या

अडीच लाखांचा ऐवज लंपास; कोतवालीत गुन्हा दाखल
केडगावात दोन ठिकाणी घरफोड्या

अहमदनगर|Ahmedagar

केडगाव उपनगरात चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरूच असून शनिवारी रात्री केडगावच्या माधवनगरमध्ये दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या.

या घरफोड्यात 2 लाख 61 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा कोंडीराम आव्हाड (वय- 43 रा. माधवनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

केडगाव उपनगरात चोर्‍या, घरफोड्यांत वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी केडगावच्या माधवनगरमध्ये प्रवेश केला. शोभा आव्हाड यांचे लिंक रोडवरील गणपती कारखान्याजवळ घर आहे. प्रथम चोरट्यांनी आव्हाड यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन लाख रूपये रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा ऐवज चोरला. यानंतर शेजारी असलेल्या एका घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्याठिकाणी साडेपाच हजार रूपयांची रोख रक्कम चोरली. चार चोरटे असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पहाटे घडलेल्या या घटनेने माधवनगरमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. केडगाव उपनगरात कायमच चोर्‍या, घरफोड्या होत असल्याने गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्‍वान पथक, ठसे तज्ज्ञांना पचारण करण्यात आले होते. पुढील तपास सहायक निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com