माजी सरपंचाच्या घरावर दरोडा

तीस तोळे सोनं, दीड लाखांची रोकड लुटली || श्रीरामपुरातील खोकरची घटना
माजी सरपंचाच्या घरावर दरोडा

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील खंडोबा मंदिराजवळ राहत असलेले माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यात 30 तोळे सोनं,1 लाख 45 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. सुदैवाने त्या शेतकरी कुटुंबाला मारहाण झाली नाही.तत्पूर्वी या दरोडेखोरांनी एका ठिकाणी घराच्या दरवाजाचे कोयंडे तोडून घरातील कपाटाची उचका पाचक करून एका शेतकर्‍याच्या 10 हजार 400 रुपयांवर डल्ला मारला.

खोकर गावाच्या लगत कारेगाव रोड जवळील खंडोबा मंदिराच्या पाठीमागील गट नं.162 मध्ये वस्ती करून राहत असलेले माजी सरपंच लक्ष्मण किसन चव्हाण हे नेहमी प्रमाणे आपल्या कुटुंबियांसह हॉलमध्ये झोपलेले होते तर मुलगा लोकेश हा शेजारच्या खोलीत झोपलेला असताना काल गुरुवार दि.17 जूनच्या पहाटे 2 वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी मुख्य दरवाजाच्या बाहेरची कडी लावून उत्तरेकडील दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाची चावी शोधून कपाट उघडून कपाटात उचका पाचक करत सोन्याचे दागीने व रोख 1 लाख 45 हजारांची रक्कम चोरली, तसेच याच खोलीलगत असलेल्या बाथरूमवजा खोलीतील बंदूक दरोडेखोरांनी घराच्या बाहेर आणून लगतच्या झाडात टाकून दिली.

या घटनेत चव्हाण यांच्या कपाटातून दरोडेखोरांनी 6 तोळे सोन्याच्या 4 बांगडया, 4 तोळ्यांचे मंगळसुत्र, साडेतीन तोळ्याचा हार, सहा तोळे वजन असलेल्या अकरा सोन्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याचे दोन जोड कर्ण फूलं, पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन चेन, अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मनी, दोन तोळे वजनाचे नाकातील नथ व सर. व ट्रॅक्टर घेण्यासाठी घरी आणून ठेवलेले रोख एक लाख पंचेचाळीस हजारांची रोकड असा सुमारे आठ लाखांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले. यावेळी दरोडेखोरांनी पळविलेल्या सुटकेस मधील एका बँकेचे पासबुक, चेकबुक व न्यायालयीन कामकाजाची कागदपत्रेही लंपास केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

हा प्रकार चव्हाण यांच्या सकाळी पाच वाजता उठल्यानंतर लक्षात आला. चव्हाण कुटूंबीयांनी तालुका पोलीस ठाणे गाठले, परंतु संबधीत ठाणे अंमलदार यांनी साडेआठ वाजेपर्यंत निष्ठत ठेवले. यावेळी येथील पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण हे स्वतः पोलीस ठाण्यात हजर होते. दोन तासानंतर लोकप्रतिनिधींशी संपर्क केल्यानंतर सुत्रं हलली. पो. नि. मधुकर साळवे यांनी घटना घटल्याचे समजताच स्वतःच्या वाहनाने घटनास्थळी दाखल होत, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, अहमदनगर येथून श्वान पथक व हस्तरेषा तज्ज्ञ पथक बोलावून तपासाची चक्रे फिरविली. श्वान पथकाने चव्हाण यांच्या वस्तीपासून अर्धा किमी कारेगाव रोडच्या दिशेने धाव घेतली. तेथून पुढे श्वान पथकाचा तपास संपला.

तसेच येथून जवळच कारेगाव रोडलगत वस्ती असेलेले रवींद्र कुसेकर यांच्या घराचा दरवाजाचा कोयंडा तोडून कपाटातील 10 हजार 400 रुपये दरोडेखोरांनी चोरले. कुसेकर यांच्याही सकाळी उठल्या नंतर लक्षात आला.

यावेळी आलेल्या श्वान पथकाचे नेतृत्व पोलीस हवालदार श्री. विरकर व श्री. खाडे यांनी केले तर हस्तरेखा तज्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मदने यांनी काम बघितले त्यांना पोहेकॉ जयराम जंगले यांनी सहकार्य केले.

या प्रकरणी तालुका पोलीसात माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा रं. नं. 179/2021, भादंवि कलम 457,380 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. निरीक्षक मधुकर साळवे यांचे मार्ग दर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत.

दरम्यान, हा चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण हे चुलते लक्ष्मण चव्हाण यांना घेऊन तालुका पोलीस ठाण्यात गेले असता, डयुटीवरील ठाणे अंमलदार यांनी सदर घटनेचे गाभीर्याकडे दुर्लक्ष करत आम्हाला दोन तास तिष्ठत ठेवले, नंतर लोकप्रतिनिधींची मला मदत घ्यावी लागली, लोकप्रतिनिधींनी अतिरीक्त पोलीस अधिक्षक दीपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याशी संपर्क केल्यानंतर ठाणे अंमलदार सरळ झाले. परंतु मी पोलीस पाटील असताना माझी ही अवस्था झाली तर सर्व सामान्याचे काय होत असेल.. अशी खंत यावेळी पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com