
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
तालुक्यातील धानोरे शिवारात आडत व्यापार्याचे वाहन आडवून मारहाण करत 10 लाखाची रोकड लुटल्याची घटना घडली होती. यातील संशयित टोळक्यास स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीसांनी जरेबंद केले. त्यांच्याकडील 7 लाख 10 हजाराची रक्कम पोलीसांनी हस्तगत केली आहे. यामध्ये व्यापार्याच्या नोकराचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
तुषार उर्फ सोन्या दिपक आल्हाट (19), पृथ्वीराज उर्फ बबलु बाळासाहेब चव्हाण (20) व गणेश सुभाष कांबळे (19, सर्व रा. सोनेगांव ता. जामखेड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनेगाव येथील दत्तात्रय कुंडलीक बिरंगळ यांचा आडतीचा व्यवसाय आहे. 15 फेबु्रवारी रोजी सायंकाळी दुकानाचा हमाल गणेश कांबळे व दोघे बार्शी (जि. सोलापूर) येथून भुसार मालाची विक्री करुन 10 लाख रुपये त्यांचे े मोटारसायकलवरुन गावी येत असतांना लोहकरे वस्ती धनेगांव शिवार येथे दोन अनोळखी व्यक्तींनी बिरंगळ यांना यांची गाडी आडवून पाठीमागून बांबुच्या दांडक्याने मारहाण करुन व मोटार सायकल चालक गणेश कांबळे यास रोडचे दुसरे बाजूस ढकलून देऊन दोघांनी फिर्यादीस दांडक्याने मारहाण करुन हातामधील 10 लाखाची रोकड असलेली पिशवी पळवून नेली होती.
या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कर्मचारी सोपान गोरे, मनोहर शेजवळ, सुनिल चव्हाण, बापू फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, संदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, भिमराज खर्से, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, पोकॉ. विनोद मासाळकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर, भरत बुधवंत यांचे पथकाने संशयावरून हमाल गणेश कांबळे याचा पाठलाग करून हा गुन्हा उघडकीस आणला. त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 10 हजार रुपये रक्कम व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.