दरोड्याच्या तयारीतील दहा दरोडेखोरांची टोळी जेरबंद
सार्वमत

दरोड्याच्या तयारीतील दहा दरोडेखोरांची टोळी जेरबंद

23 लाखांच्या मुद्देमालासह घातक हत्यारे जप्त ; आश्वी पोलिसांची कामगिरी

Arvind Arkhade

आश्वी|वार्ताहर|Ashwi

संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्यमार्गावर असलेल्या चिंचपूर शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा पाठलाग करून आश्वी पोलिसांनी दोन दरोडेखोरांसह दोन मालवाहतूक ट्रक, एक मालवाहतूक पीकअप व घातक शस्त्रे असा सुमारे 23 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याचं दरोडेखोरांच्या टोळीतील आणखी 8 जणांना असे एकूण 10 दरोडेखोर पकडले आहेत. तर दोन आरोपी पसार झाले आहेत.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास मी, पोलीस नाईक शांताराम झोडगे, आनंद वाघ, होमगार्ड अमोल सहाणे, माजी सैनिक दामोदर भोसले यांच्या समवेत गस्त घालत होतो. यावेळी लोणी - संगमनेर रस्त्यावरील चिंचपूर शिवारात असलेल्या वृंदावन हॉटेल समोर दोन मालवाहतूक ट्रक (क्र. एम. एच. 10 ऐडब्ल्यू. 71,) व (एम. एच. 40 बीएल 5569, तसेच एक पिकअप व्हॅन (एम. एच. 25 ऐजे 2148) या तीन वाहनांमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्याने आम्ही चौकशीसाठी तिकडे वळालो.

परंतु पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून ट्रकमधील 8 ते 9 व पिकअप मधील दोघे अंधारात पळाले. त्यामुळे आम्ही पाठलाग करून अरुण उर्फ बिभिषण काळे (वय - 30, रा. कन्हेरवाडी फाटा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व समाधान शहाजी घुमरे (रा. आदोरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या दोघांना पकडले. यावेळी त्याच्या वाहनाची तपासणी घेतली असता लोखंडी कटर, धारदार सुरा, लोखंडी कटावण्या, गज अशी घातक हत्यारे मिळून आली.

त्यामुळे पकडलेल्या दोघांकडे पळून गेलेल्यांची माहिती विचारल्यानंतर त्यानी नाना भास्कर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे, बाबुशा भीमराज काळे, बिभिषण राजाराम काळे, रमेश लगमन काळे, सुभाष उर्फ हरी उर्फ दादा भास्कर काळे, चंदर ऊर्फ चंदर्‍या भास्कर काळे, सुधाकर श्रावण भगत, नवनाथ बाळू काळे व बाबू अनिल शिंदे सर्व कळंब तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) हे रहिवासी पळाल्याचे सांगितले.

त्यामुळे आम्ही लोणी व नगर नियत्रंण कक्षाला याबाबत माहिती दिली. यानंतर इतर आरोपीचा शोध घेतला असता कोल्हार (ता. राहाता) येथून नाना भास्कर ऊर्फ भाषा काळे, राहुल कालिदास काळे व बाबुशा भीमराज काळे यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यानी सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान यावेळी नगर येथील पोलीस नाईक सुनील चव्हाण यांच्या पथकाने उर्वरित पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळत त्यांना आश्वी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात या बारा आरोपींविरुध्द गुरनं 106/2020 भादंवी कलम 399, 402 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर दोन आरोपी पसार असल्याची माहिती दिली.

Deshdoot
www.deshdoot.com