दरोड्याच्या तयारीतील टोळी हत्यारासह जेरबंद

एलसीबीची कामगिरी || राहाता येथील चौघांचा समावेश, दोघे पसार
दरोड्याच्या तयारीतील टोळी हत्यारासह जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. टोळीतील दोघे पसार झाले आहेत. पकडलेले सराईत गुन्हेगार असून ते सर्व राहाता तालुक्यातील आहे. त्यांच्याकडून तलवार, लाकडी दांडके, मिरची पुड, दोरी असा 30 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी ते शेंडी बायपास रोडवरील वडगाव गुप्ता (ता. नगर) शिवारात बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

राहुल अनिल काळे (वय 29), शुभम अनिल काळे (वय 24), भरत तात्याजी काळे (वय 24), विकास शेखर जाधव (वय 20, सर्व रा. गणेशनगर ता. राहाता) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. तर अक्षय यशवंत आव्हाड आणि आनंदा अनिल काळे (दोघे रा. गणेशनगर ता. राहाता) हे पसार झाले आहेत. सहा जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 399, 402, आर्म अ‍ॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संतोष लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.

हत्यारासह पाच ते सहा जणांची टोळी वडगाव गुप्ता शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने बुधवारी रात्री एमआयडीसी ते शेंडी बायपास रोडवरील वडगाव गुप्ता शिवारात सापळा लावला असता चौघांच्या टोळीला हत्यारासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मुंडे, उपनिरीक्षक गोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com