घरफोडी करणारे तिघे जेरबंद

एलसीबीची कारवाई; 35 हजार रूपये जप्त
घरफोडी करणारे तिघे जेरबंद

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

घरफोडी करणार्‍या दोघा सख्या भावांसह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पल्या ऊर्फ जमाल ईश्‍वर भोसले (वय- 22), भगवान ईश्‍वर भोसले (वय- 20 दोघे रा. बेलगाव ता. कर्जत), प्रितम गुड्या चव्हाण (वय- 25 रा. मिरजगाव ता. कर्जत) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.

त्यांच्याकडून चोरी केलेले 35 हजार रूपये पोलिसांनी जप्त केले आहेत. तर, चोरीचे दागिणे घेऊन मिनाबाई ईश्‍वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत) ही पसार झाली आहे.

जयसिंग लालासाहेब शेटे (रा. डीकसळ ता. कर्जत) हे त्यांचे घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा 48 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी शेटे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक तपास व गुप्त खबर्‍यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींची माहिती काढली.

सदरचा गुन्हा पल्या भोसले व त्याच्या साथिरांना केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी सुरूवातीला पल्या भोसले याला बेलगाव परिसरात अटक केली. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारा केली असता भगवान भोसले व प्रितम चव्हाण यांच्या मदतीने गुन्ह्या केला असल्याची कबूली दिली.

पोलिसांनी भगवान व प्रितम यांना बेलगाव परिसरातून अटक केली. अटक करण्यात आलेले तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक शिरीषकुमार देशमुख, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस कर्मचारी बबन मखरे, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, मेघराज कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com