
अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले तालुक्यातील समशेरपूर परिसरात वृध्द व्यक्तीस मारहाण करून पैशाची लूट करणारी टोळी मुद्देमालासह गजाआड करण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे.
दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास समशेरपूर येथून ठाणगावकडे जात असताना चिचखांड परिसरात चार अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेचे डेली कलेक्शन करणार्या तक्रारदारास अडविले. त्यांना गाडीवरून खाली ढकलून देऊन मारहाण करून त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला होता. आरोपी हे त्यांचेकडील दोन मोटार सायकलवरून पळून गेल्याची घटना घडली होती.
याबाबत अकोले पोलीस गुरनं 86/2023 भा.दं.वि. कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची माहिती मिळताच बिट अंमलदार यांनी तात्काळ समशेरपूर दूरक्षेत्र हद्दीत गावातील लोकांना फोनव्दारे माहिती देऊन चार अज्ञात इसमांचा शोध सुरू केला. सदर आरोपी मुथाळणे गावाच्या परिसरात डोंगरात लपलेले असल्याची माहिती मिळाल्याने अकोले पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला असता आरोपी अंधाराचा व भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांचेकडील मोटारसायकल सोडून पळून गेले.
मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सदर आरोपींपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यातील एक आरोपी हा पसार झाला होता. सदर आरोपींचा गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याने त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली होती.दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात पसार आरोपी नं .4 याला पकडण्यात यश आले असून आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल फोन, गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली वाहने व मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 3 हजार 380 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते (वय 28 वर्षे,) लखन डेरासिंग माचरेकर (वय 25 वर्षे,) प्रेम विजय वाल्हेकर (वय 21 वर्षे,) प्रशांत मंगलदास गिर्हे (वय 22 वर्षे )सर्व रा. घुलेवाडी ता. संगमनेर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते याचेवर संगमनेर पोलीस स्टेशन येथेही काही गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. या आरोपींकडून अजुनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे, पो.ना. अजित घुले,पो.ना. रविंद्र वलवे, पो.कॉ. प्रदीप बढे, पो.ना. विठ्ठल शेरमाळे, पो.कॉ अविनाश गोडगे, पो.कॉ. सुयोग भारती, पो.कॉ. आनंद मैड, पो.कॉ. आत्माराम पवार, पो.कॉ. संदीप भोसले, पो.ना. सोमनाथ पटेकर, पो.ना. गोविंद मोरे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे करीत आहेत.