अस्तगावच्या दांम्पत्याला लुटणारे राहुरीचे दोघे जेरबंद

एक अल्पवयीन ताब्यात; एलसीबीची कारवाई
अस्तगावच्या दांम्पत्याला लुटणारे राहुरीचे दोघे जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देहरे (ता. नगर) येथे दुचाकी आडवून दाम्पत्यास चाकुचा धाक दाखवून लुटणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केेली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अंबादास अशोक खेमनर (वय 22) व नागेश्वर संजय चव्हाण (वय 20 दोघे रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

कांचन रवींद्र घोरपडे (वय 24, रा. अस्तगाव, ता. राहाता) या त्यांचे पती रवींद्र घोरपडे दुचाकीवरून देहरे गावचे शिवारातून रस्त्याने जात असताना दुचाकी टायरची हवा तपासण्यासाठी थांबले. तेथे दोन दुचाकीवर अनोळखी चार इसम येवून रवींद्र घोरपडे यांना मारहाण करून कांचन यांच्या हाताची बोटे पिरगळून चाकुचा धाक दाखवुन रवींद्र यांच्या खिशातील पाच हजार रूपये रोख रक्कम घेवून गेले होते. या घटनेबाबत कांचन घोरपडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. त्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, दीपक शिंदे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांचे पथक काम करत होते. अंबादास खेमनर याने त्याचे साथीदारासह सदरचा गुन्हा केला असुन तो मोमीन आखाडा, राहुरी येथे त्याचे राहते घरी असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती.

त्यांनी पथकाला सूचना करून खेमनर याचा शोध घेण्यास सांगितले. पथकाने खेमनरला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा त्याचे साथीदारांचे मदतीने केल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार नागेश्वर चव्हाण याला देखील ताब्यात घेत अटक केली तर एका अल्पवयीन मुलाचा या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com