संगमनेर (प्रतिनिधी)-

पोलीस असल्याचा बनाव करत एका 70 वर्षीय व्यक्तीचे सुमारे 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोघा अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शहरातील शेतकी संघासमोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कारभारी पुंजीराम पानसरे (वय 70, रा. गोविंदनगर, संगमनेर) हे नाशिकरोडने शेतकी संघासमोर चालले असता अचानक मोटारसायकलहून दोघे जण आले. ते पानसरे यांना म्हणाले, आम्ही पोलीस आहोत काल रात्री आम्ही गांजा पकडला असून त्याची चेकिंग चालू आहे. तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत टाका. असे म्हणाल्यावर पानसरे यांनी चेन, अंगठ्या हातातील पिशवीत टाकल्या.

त्यानंतर दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील पिशवी हातात घेऊन काही वेळातच पिशवी पुन्हा परत दिली असता त्यात सोन्याचे दागिने नव्हते. पानसरे यांनी काही बोलायच्या आतच दोघा जणांनी मोटारसायकलहून धूम ठोकली. 24 हजार रुपयांची दीड तोळ्याची चेन, 16 हजार रुपयांची 1 तोळ्याची अंगठी, 56 हजार रुपये किमतीची तिचेवर बारीक खडे असलेली अंगठी असा एकूण 1 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

याबाबत कारभारी पानसरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 15/2021 भारतीय दंड संहिता 170, 420 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खाडे करत आहेत.