
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणताांबा येथे दोन दिवसापूर्वी गणपती फाट्याच्या जवळ श्रीरामपूर येथील शुमम चोरडीया या पार्सल ने आण करणार्या तरुणावर नंबर नसलेल्या पल्सर गाडीवर आलेल्या लुटारुंनी कोयत्याने हल्ला करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम, कुरिअर बॅगसह इतर साहित्य घेऊन पोबारा केला. सदर तरुण सध्या श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पीटल मध्ये औषध उपचार घेत आहे.
राहाता तालुक्यात पुणतांबा गाव गुन्हेगार व अवैध धंदे करणार्यांचे केंद्र बनले आहे. गावात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चोर्या होत असून चोर सापडूनही एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. विशेष म्हणजे येथील मटका कॉलनीमध्ये दिवसा ढवळ्या चोरट्यांनी कट्टा लावून तसेच कोयता दाखवून रोख रक्कम घेऊन पोबारा केला. मात्र पोलीस स्टेशनला झंझट नको म्हणून कोणी तक्रार दाखल केली नाही.
पुणतांबा गावात पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध धंद्यांनी चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे गावात गुंडगिरी वाढली आहे. प्रत्येक गल्लीत दादा, भाई तयार झाले आहे. रस्ते, गावठाण यांच्या जागेवर अतिक्रमण करून त्यातून पैसे मिळविणार्यांची टोळी गावात तयार झाली आहे. गावातील एकमेकांचे पाय ओढण्याच्या राजकारणामुळे अवैध धंदे करणारे व गुंडगिरी करणार्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे सध्या अनेक सूज्ञ ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे.
पुणतांबा गावाच्या उत्तरेला गोदावरी नदीच्या पलिकडच्या बाजूला औरंगाबाद जिल्ह्याची हद्द लागत असल्यामुळे परिसरात गुंडगिरी तसेच चोर्या करून दुसुर्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात गुन्हेगार लगेच जात असल्यामुळे पोलिसांना तपास करणे अवघड होत चालले आहे. या घटनामुळे गावातील ग्रामस्थ सुरक्षित नसल्याचे जाणवत असून त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.