रस्ता कामाच्या धुळीमुळे नेवासाफाटा येथील व्यावसायिक त्रस्त

रस्ता कामाच्या धुळीमुळे नेवासाफाटा येथील व्यावसायिक त्रस्त

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

नेवासाफाटा ते नेवासा रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी रहदारी असल्याने नागरिकांसह वाहनधारकांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या रहदारीतून उडणार्‍या धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढलेली आहे.

या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते. दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत.त्यामुळे केव्हाही अपघात घडू शकतो मग या अपघातांना जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले असून रस्ता काम उरकणार्‍या या ठेकेदाराकडून धूळ गायब करण्यासाठी सकाळी रस्त्यावर टँकरने पाणी मारले जाते मात्र दुपारनंतर पुन्हा धुळीचा प्रचंड त्रास वाहनधारकांसह व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.

नेवासाफाटा-नेवासा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले असून वाहनांचा अपघात होऊन अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याकडे सार्वजनिक. बांधकाम विभागांकडून दुर्लक्ष केले गेले.

धूळ श्वासावाटे शरिरात जाते. त्यामुळे अ‍ॅलर्जीचा त्रास असणार्‍यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास जाणवू लागले आहेत तर काहींना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे असे त्रास होत आहेत. या धूलिकणांचा दीर्घकालीन परिणाम होण्यापुर्वीच संबंधित ठेकेदाराने वेळीच उपाय करावा अन्यथा नागरिकांच्या रोषातून ठेकेदारासह बांधकाम विभागाला धडा शिकविण्याचा इशारा ग्रामस्थांकडून दिला जात आहे.

रस्त्याशेजारी असलेल्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने खबरदारी घेवूनच काम करावे व धुळीपासून मुक्तता होण्यासाठी उपाययोजना करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त व्यावसायिकांसह ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com