अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रस्त्यावर सांडपाणी सोडणार्या नागरिकांवर महापालिका यापुढे दंडात्मक कारवाई करणार आहे. दंडात्मक कारवाईनंतरही सुधारणा न झाल्यास थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

गत दोन महिन्यापासून नगर शहरात अनेक रस्त्यांची दुरूस्ती, पॅचिंग, तसेच अनेक ठिकाणी नव्याने डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. हे कामे सुरू असताना किंवा पूर्ण झाल्यानंतर महापालिका अधिकार्यांनी भेटी दिल्या त्यावेळी रस्त्यावर पाणी आल्याचे निदर्शनास आले.

निवासी आणि व्यावसायिक अस्थापना स्वच्छ केल्यानंतर, धुतल्यानंतर, परिसर स्वच्छ केल्यानंतर ते पाणी निष्काळजीपणे रस्त्यावर सोडले जाते. रस्ते दुरूस्ती, पॅचिंग करताना डांबर, खडी टाकून रोलिंग केल्यानंतर काही तासातच नागरिकांनी कुठलाही विचार न करता पाणी सोडल्याचे निदर्शनास आले. पाणी व डांबर याचे तांत्रिकदृष्ट्या वितुष्ठ असते.

ताज्या केलेल्या डांबराच्या पायामध्ये पाणी गेल्यास खडी रस्ता सोडून देते. त्यामुळे केलेले काम उखडले जाते. त्यामुळे जनतेच्या पैशाच्या अपव्यय होतो. नागरिकांच्या रोषाला महापालिका अधिकारी व पदाधिकार्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होते. रस्त्यावर पाणी सोडणार्या नागरिकांकडून यापुढे दंड वसूल केला जाणार आहे. दंड वसूल करूनही ऐकणार नाहीत अशा लोकांविरोधात महापालिका फौजदारी कारवाई करणार आहे.

नोटीस दिल्यानंतरही...

काम सुरू असताना रस्त्यावर पाणी सोडले म्हणून गुलमोहर रोड, शहर गावठाण परिसरातील लोकांना नोटीसा दिल्या. मात्र तरीही त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. रस्त्यावरील पाण्यामुळे पादचार्यांना त्रास होतो. रस्त्यावरून येणार्या जाणार्या वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर पाणी उडते. त्यातून छोटेमोठे वाद होतात. ही बाब योग्य नसल्याने नागरिकांनी रस्त्यावर पाणी सोडू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.