
नेवासा |प्रतिनिधी| Newasa
गल्लीपासून दिल्ली पर्यंत सत्ता असणार्या भाजपच्या नेवासा तालुक्यातील विद्यमान तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांना अचानक आंदोलन करण्याचा साक्षात्कार का झाला? हीच चर्चा भेंडा-गोंडेगाव रस्ता कामाबाबत झालेल्या आंदोलनामुळे सध्या भेंडा परिसरात झडत आहे.
नेवासा तालुक्यातील 100 कोटींच्या कामांना माजी लोकप्रतिनिधी यांनी राजकीय सुडभावनेतून तालुक्यातील कामांना स्थगिती मिळवली. यामुळे अनेक कामे ठप्प झाली आहेत. जर सदर कामे स्थगित झाली नसती तर तालुक्यातील अनेक रस्ता कामे मार्गी लागली असती व नागरिकांची दळवळणाची गैरसोय झाली असती परंतु राज्यात सत्ता असूनही कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याऐवजी माजी आमदार यांनी कामे स्थगित करण्यात धन्यता मानली. एका बाजूला कामांची स्थगिती तर दुसर्या बाजुला गौण खनिज वाहतुकीस असलेली बंदी यामुळे मंजूर कामेही ठप्प आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
भेंडा-गोंडेगाव हा रस्ता गेल्या 5 वर्षांपासून ठप्प असून सदर रस्ता काम सुरू करण्यास आपली शक्ती खर्ची लावण्याऐवजी माजी आमदार यांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदाराबरोबर अंधारात मीटिंग केल्या. काही दिवसांपूर्वीही माजी लोकप्रतिनिधी यांनी सदर ठेकेदार यांच्याबरोबर मीटिंग घेतली व त्या अंधारातील मिंटींगचे फलित न निघाल्याने त्यांनी फक्त एका ग्रुप पुरते मर्यादित असलेले, माजी लोकप्रतिनिधी यांनी सांगितले ते ऐकणारे व पक्षाशी काहीही देणे घेणे नसलेले तालुका अध्यक्ष यांना पुढे करून आंदोलन करण्याचा फार्स केला आहे.
हा फक्त व्यतिगत स्वार्थासाठीच आहे.माजी लोकप्रतिनिधी यांना तालुक्याच्या प्रश्नांचे घेणे देणे नसून त्यांना मीच तालुका भाजप चालवतो हे दाखवण्यासाठी हा अट्टहास सुरू ठेवला आहे,अशी चर्चा नेवासा भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे.
भेंडा-गोंडेगाव रस्ता आंदोलनाच्या माध्यमातून पालकमंत्री यांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे व यामागील झारीतील शुकाचार्य कोण आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे, असा आरोप माजी उपसभापती तुकाराम मिसाळ यांनी केला आहे.
आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्याच सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रकार नेवासा तालुक्यात चालू असून पूर्वी याच ठेकेदार व आपल्या नेत्याचे काय संबंध होते तसेच मागील महिन्यात नेवासा फाट्यावर यांना अंधारात कोण भेटले, कशावरून चर्चा फिस्कटली याचाही खुलासा त्यांनी केला पहिजे व सत्य जनतेसमोर आले पाहिजे. नेवासा तालुक्यातून कोण माजी आमदार पालकमंत्री यांना अडचणीत आणत आहे हे आता उघड झाले आहे.
- नागेश आघाव